कणकवली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोरे नं. १ ग्रामपंचायतीचे जिल्हास्तरीय मूल्यमापन

शेअर करा

कणकवली,दि.०६ जुन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या समितीने गुरुवारी लोरे नं. १ ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामे व उपक्रमांची पाहणी केली. अभियान कालावधीत ग्रामपंचायतीने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे समितीने कौतुक करत समाधान व्यक्त केले.


जिल्हा परिषद कोल्हापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयवंत उगले, प्रकल्प संचालक माधुरी परीट, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे, विस्तार अधिकारी रविंद्र कुंभार, सचिन शिरदवाडे, लक्ष्मण पाचगावे, शुभम राऊत आदी सदस्यांचा समावेश होता.


समितीचे ग्रामपंचायत लोरे नं. १ येथे आगमन झाल्यानंतर सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंचायत समिती कणकवलीचे गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश वालावलकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग व रामचंद्र शिंदे उपस्थित होते.


सरपंच अजय रावराणे यांनी १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या अभियान कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामे, लोकसहभागातून पूर्ण केलेले उपक्रम, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाच्या योजनांची सविस्तर माहिती समितीसमोर मांडली.


यानंतर समितीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. श्री गांगोचाळा मंदिर परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर समितीने ग्रामपंचायतीच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली.


यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, उपसरपंच रसिका रविंद्र राणे, ग्रामपंचायत सदस्य नरेश गुरव, सुप्रिया रावराणे, पोलिस पाटील, शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. समितीच्या भेटीदरम्यान सर्वांनी सहकार्य करून ग्रामपंचायतीच्या विकासकामांची माहिती सादर केली.

शेअर करा