कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीचा ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चा संदेश

शेअर करा

विधवा प्रथेला विरोध करणाऱ्या तृप्ती ठाकूर यांना ध्वजारोहणाचा मान

कणकवली,दि.१३ ऑगस्ट

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात साजरे होत असताना कलमठ ग्रामपंचायतीने ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चा प्रेरणादायी संदेश दिला आहे. ग्रामपंचायतीने विधवा प्रथा न पाळता स्त्री सन्मान जपणाऱ्या कलमठ येथील तृप्ती आशुतोष ठाकूर यांना ध्वजारोहणाचा मान देत त्यांच्या धैर्याचा आणि सामाजिक भूमिकेचा गौरव केला.

कलमठ ग्रामपंचायतीकडून दरवर्षी गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ध्वजारोहणाचा मान दिला जातो. यापूर्वी गुणवंत विद्यार्थी, सफाई कर्मचारी आदींचा सन्मान करण्यात आला आहे. यंदाच्या पहिल्या दिवसाच्या ध्वजारोहणाचा मान तृप्ती ठाकूर यांना देण्यात आला.

विशेष म्हणजे, तृप्ती ठाकूर यांच्या पतीचे अवघ्या २० दिवसांपूर्वी निधन झाले. अशा कठीण प्रसंगी पारंपरिक विधवा प्रथा न पाळता त्यांनी स्त्री सन्मान आणि आत्मसन्मान जपण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या धाडसी निर्णयाची दखल घेत ग्रामपंचायतीने त्यांना ध्वजारोहणाचा पवित्र मान दिला. या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला.

‘महिला स्नेही गाव’ म्हणून कलमठची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न

यावेळी सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले, “कलमठ ग्रामपंचायत नेहमीच ‘महिला स्नेही गाव’ म्हणून विविध उपक्रम राबवत आहे. ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला विरोध करणारा ठराव घेतला असून, विधवा प्रथा न पाळणाऱ्या महिलांसाठी घरपट्टी माफ करण्याचा निर्णयही घेतला आहे. ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चा नारा देत त्याच ठरावासोबत राहून तृप्ती आशुतोष ठाकूर यांनी घेतलेल्या भूमिकेचा सन्मान म्हणून त्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.”

“अशा महिलांसोबत आणि त्यांच्या पाठीशी आपले गाव कायम उभे राहील, असा संदेश आजच्या दिवशी देण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासोबतच स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सन्मान जपण्याचा प्रामाणिक हेतू ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे,” असेही सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले.

यावेळी मुख्याध्यापिका मधुरा सावंत यांच्या हस्ते तृप्ती ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला उपसरपंच रवींद्र यादव, मुख्याध्यापिका मधुरा सावंत, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, इफत शेख, स्वाती नारकर, विद्या लोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कलमठ ग्रामपंचायतीच्या या उपक्रमातून ‘हर घर तिरंगा’सोबतच ‘हर नारी सन्मान’ हा सामाजिक संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचला.

शेअर करा