कणकवली तहसिलदार यांच्याकडे दिला प्रस्ताव ; सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा केला आरोप
कणकवली,दि.०७ ऑक्टोंबर
पिसेकामते ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच प्राजक्ता नितीन मुद्राळे यांच्याविरोधात ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला आहे. सरपंचांचा कारभार समाधानकारक नाही. ग्रामपंचायतचा कारभार करत असताना सदस्यांशी समन्वय न ठेवता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
प्रस्तावात नमूद केल्यानुसार, सरपंच ग्रामपंचायतीचे कामकाज करताना विकासकामे तसेच ग्रामपंचायत सदस्यांशी आवश्यक समन्वय ठेवत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजात सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेत नाहीत. ग्रामपंचायतीसाठी वॉटर फिल्टर खरेदी करताना कमी किमतीच्या साहित्याची अधिक किमतीत खरेदी दाखवून चुकीची बिले जोडण्यात आली आहे. तसेच जीएम पोर्टलवरील ग्रामपंचायत साहित्य खरेदीच्या प्रक्रियेत मनमानी करत आहेत. ग्रामस्थांच्या विविध कामांसाठी सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नसतात. या सर्व कारणांमुळे सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
कणकवली तहसीलदारांना 7 ऑक्टोंबर रोजी सादर केलेल्या प्रस्तावावर उपसरपंच सुहास सुनील कदम, संकेत रत्नाकर राणे, देवेंद्र जनार्दन सावंत, रेश्मा रमेश चव्हाण आणि श्रावणी रवींद्र जाधव यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.या प्रस्तावावर तहसीलदारांकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.