कणकवली : वारगाव जिल्हा परिषद शाळेच्या एसी वर्गखोल्यांचे पंचायत समितीकडून कौतुक

शेअर करा

कणकवली पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर; आधुनिक शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कणकवली,दि.०१ जुन

कणकवली पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत वारगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व वर्गखोल्या वातानुकूलित (एसी) केल्याबद्दल संबंधित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करणारा घेण्यात आला आहे.
पंचायत समितीची सर्वसाधारण सभा दिनांक ५ मे २०२६ रोजी संपन्न झाली होती. या सभेत वारांग जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगले व आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शाळेच्या सर्व वर्गखोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
ठरावानुसार, या उपक्रमासाठी वारांगचे सरपंच नानाशेठ शेट्ये, ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र तलावडे, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापक एम. तळवणकर, शिक्षकवृंद तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केलेल्या या कार्याचे सभागृहाने कौतुक केले.
हा ठराव पंचायत समिती सदस्य राजेश जाधव यांनी सूचविला असून गुरुप्रसाद शिंदे यांनी त्यास अनुमोदन दिले. पंचायत समितीने या अभिनव उपक्रमाबद्दल संबंधित सर्वांचे अभिनंदन करून भविष्यातही अशा शैक्षणिक विकासकामांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शेअर करा