कणकवली : सिंधुदुर्ग पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनेल -सुभाष देसाई

शेअर करा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यासाठी प्रयत्न; शिवसेनेची जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरणार

कणकवली,दि.२२ ऑगस्ट

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी दौरे सुरु आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे पक्षातील उणीवा दूर केल्या जातील. शिवसेना नेत्यांचे दौरे वारंवार होणार आहेत. शिवसैनिकांनी काही मांडलेले मुद्दे लक्षात घेवून त्यावर उपापयोजना केल्या जातील. सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला बनेल , असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, बाबुराव धुरी, कणकवली विधानसभाप्रमुख सुशांत नाईक, उत्तम लोके, संदीप कदम, राजू राठोड आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. यावेळी सर्व नेत्यांनी जिल्हानिहाय दौरे करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, अशा सूचना पक्षप्रमुखांनी दिल्या आहेत. त्यानुसार राज्यभर दौरे आम्ही सर्वजण करत आहोत. इथे आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा सिंधुदुर्गात व्हावा , अशी मागणी आहे. त्यानुसार मुंबईत जाऊन वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा होईल. तसेच आदित्य ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचेही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरे वाढविण्यात येतील. तालुकानिहाय दौरे, शाखा उद्घाटने आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटींना प्राधान्य देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आले आहेत.
यापूर्वीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी व नेते पुरेशा प्रमाणात सक्रिय दिसले नाहीत, अशी टीका होत आहे. काही ठिकाणी उमेदवार न मिळाल्याने बिनविरोध निवडी झाल्या आणि कार्यकर्ते व पदाधिकारी वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. त्याबाबत मी स्वतः सिंधुदुर्गात आलो आहे. यापुढे अशा प्रकारचे दौरे वारंवार होतील. पदाधिकाऱ्यांकडून सूचना घेतल्या आहेत. पक्षातील ज्या काही उणीवा असतील त्या दूर करून नव्या जोमाने काम केले जाईल,” असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीतील काही पदे रिक्त आहेत. मुंबईला परतल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि गरज भासल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दौरे अद्याप झाले नसतील, तर त्याचीही दखल घेतली जाईल. संबंधित पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात नियमित दौरे करून संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे, अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात येईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार यांनी आपल्या मतदारसंघातील, विशेषतः दुर्गम भागातील अंगणवाड्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी. आहाराचा दर्जा, उपलब्ध सुविधा आणि कारभारातील त्रुटी यांची माहिती घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. आवश्यक असल्यास हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्याच्या सूचना आमदारांना दिल्या जातील. राजकारणात विकासाला कोणताही धर्म किंवा जात नसते. आमची जात आणि धर्म हा विकास आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून जात-पात बाजूला ठेवून मराठी समाजाची एकजूट करण्याचा संदेश दिला होता. त्याच विचाराने शिवसेना पक्षाचे काम सुरु आहे. पुण्यात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वाद म्हणजे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आवाजाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी विरोधी पक्षांच्या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्यासाठी संघटनांचा वापर करणे योग्य नाही. विरोधी पक्षांमध्ये समन्वय आणि एकजूट वाढल्यास भविष्यात सत्ताबदलही होऊ शकतो, असा इशारा सुभाष देसाई यांनी दिला.

वैभव नाईकांवरील टीकेचा निषेध

कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टीकेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय विरोध असला तरी टीका करताना भाषेचे भान ठेवले पाहिजे. कमरेखालचे वार सहन केले जाणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे कठोर शब्दांत टीका करीत असले तरी त्यांनी टीकेची एक मर्यादा कधीही ओलांडली नव्हती. त्यामुळे विरोधकांवर कितीही राजकीय टीका केली तरी शब्दांची पातळी सांभाळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

शेअर करा