कणकवली : नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा

शेअर करा

नांदगाव पंचक्रोशीतील एसटीच्या अधिका-यांकडे मागणी ; विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने वेधले लक्ष

कणकवली,दि.१७ जून

कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुल मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना खाजगी वाहनाने पाठवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नांदगाव तिठा ते वरवडे येथील सेंट उर्सुला इंग्लिश स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी नांदगाव व असलदे ग्रामपंचायतच्यावतीने वाहतूक अधिकारी गौतमी कुबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सरपंच रविराज मोरजकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , इरफान साटविलकर , विजय आचरेकर , रामचंद्र मोरये , श्रीपाद म्हापसेकर , इम्रान बटवाले , प्रशांत कदम, वसिम साटविलकर, रुबीना नावलेकर, आसिफा लांजेकर यांच्यासह पालक उपस्थित होते.
नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नांदगाव तिठा तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वरवडे येथील सेंट उर्सुला इंग्लिश स्कूलमध्ये जातात. मात्र नियमित बस सेवा उपलब्ध नसल्याने 30 ते 40 विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सकाळी ७ वाजता नांदगाव येथून बस सुटावी व दुपारी २ वाजता वरवडे येथून नांदगावकडे बस सोडण्यात यावी. या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी एसटीच्या अधिका-यांकडे सरपंच रविराज मोरजकर यांनी केली.
तसेच सावंतवाडी – रत्नागिरी सकाळी 10 वाजता सुटणारी , सावंतवाडी रत्नागिरी दुपारी 1 वाजता सुटणारी , सावंतवाडी देवरुख दुपारी 12.30 वाजता सुटणारी आणि कणकवली – नांदगाव – देवगड सकाळी 6.15 वाजता सुटणारी या फे-या सुरळीत करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर श्रीमती कुबडे यांनी महामंडळाकडे एसटी बस कमी आहेत, तरीदेखील विद्यार्थ्यांसाठी बसफेरी सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेवू असे आश्वासन दिले.

शेअर करा