आशिये ग्रामपंचायतच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ; शैक्षणिक उपक्रमांसाठी युवा संदेशचे सहकार्य राहिल
कणकवली ,दि.१५ ऑगस्ट
विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण गावात एकत्र येऊन काम करतात. सर्वांना एकत्र घेऊन कार्यक्रम करतात आणि गावाला कुठेतरी विकासासोबतच शैक्षणिक दृष्ट्या गाव पुढे नेण्याचा प्रयत्न सरपंच महेश गुरव करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात स्पर्धा परिक्षांबरोबरच इतर क्षेत्रातही असलेल्या नोक-यांकडे पाहिलं पाहिजे. त्यासाठी युवा संदेश प्रतिष्ठान व जिजाऊ संस्था काम करत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी या कलमठ मतदारसंघासाठी 2 दिवसांचे शैक्षणिक मार्गदर्शन करावे. त्यासाठी युवा संदेश प्रतिष्ठान सहकार्य करेल. विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करुन शैक्षणिक प्रगती केल्यास यश निश्चित मिळेल , असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केले.

आशिये ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने 10 वी , 12 वी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत , सरपंच महेश गुरव , पंचायत समिती सदस्य मयुरेश्वरी चव्हाण , कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके ,संदीप सावंत , माजी सरपंच शंकर गुरव ,बाळा बाणे , प्रविण ठाकूर , संजय बाणे , ग्रा.प.सदस्य सुहास गुरव, अनिल गुरव, मानसी बाणे,सत्यवान धुरी ,दिगंबर वर्दम, उमेश ठाकूर,ग्रामसेवक राकेश गोळवणकर,बाबाजी गुरव, राजन पुजारे,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय मसुरकर, निलेश ठाकुर, ग्रा.प.सदस्या संजना ठाकूर, शिक्षक सौ.मसुरकर, शिक्षिका श्रीमती सावंत, शिक्षिका श्रीमती सामंत व विद्यार्थी, पालकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. याकार्यक्रमात शिष्यवृत्ती चौथी व एसटीएस परिक्षेत स्कॉलरशिप सातवी , दहावी , बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु देवून गौरविण्यात आले.
दहावी व बारावी कोकण बोर्डाची टक्केवारी जर बघितली तर ती टक्केवारी दिसताना भरपूर दिसते. मात्र, वस्तुत: शालेय गुण देत वाढलेली निकालाची आकडेवारी आहे. जर खरोखरच निकाल योग्य पध्दतीने असता आणि त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले असते तर , अनेक अधिकारी आपल्या जिल्ह्यात घडले असते. स्पर्धा परिक्षांसाठी माझ्या राजकीय जीवनात गेली ३० ते ३५ वर्षे प्रयत्न होताना पाहतोय, मी देखील त्यासाठी प्रयत्न केला. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष ते घडत नाही. आणि यावर आपण चर्चा करतोय. त्यामुळे स्पर्धा परिक्षा व्यतिरिक्त नर्सिंग , नेव्ही किंवा अनेक कोर्सेस मधून चांगल्या नोकरीच्या संधी आहेत. गरीब कुटुंबातील काही तरुण तरुणींनी अशा नोक-या मिळवून सक्सेस मिळवला आहे, त्यांना अशा कार्यक्रमांमध्ये बोलवलं पाहिजे, तरच विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल, असे गोट्या सावंत म्हणाले.
सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या, विद्यार्थी गुणगौरव सातत्यपूर्वक सरपंच महेश गुरव करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण होतो. सामाजिक भान म्हणून हा कार्यक्रम घेतला आहे. आपल्याला जी खरी गरज आहे , ती विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली पाहिजे. आता स्थलांतरांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये चांगले टॅलेंट आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांना चांगली दिशा मिळाल्यास चांगले करियर घडेल. आता एआयचा जमाना आला आहे, त्यामध्येही विद्यार्थ्यांनी करिअर करावे.
उपसभापती सोनु सावंत म्हणाले, निकाल चांगले लागतात मात्र , ती मुले नंतर दिसुन येत नाहीत. या आशिये गावामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम नेहमी सरपंच महेश गुरव आयोजित करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. आपल्या जीवनात सर्वांनी नैसर्गिक पर्यावरण राखूया या दृष्टीने आपण निश्चितपणे प्रयत्न करायला पाहिजेत. यावेळी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय मसुरकर यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रास्ताविक मंगेश लाड तर आभार सरपंच महेश गुरव यांनी मानले.