चांगल्या साहित्याचा निकष पुरस्काराने ठरत नसतो – कवी अजय कांडर

शेअर करा

कणकवली महाविद्यालयात लेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली,दि.२६ ऑगस्ट

चांगल्या कवितेसाठी कवितेचे तंत्र महत्त्वाचे नसून तिचा आशय अधिक महत्त्वाचा असतो. केवळ कवितेचे तंत्र शिकून चांगली कविता लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही चांगल्या साहित्याचा निकष साहित्यिकाला मिळालेल्या पुरस्कारांवरून ठरत नाही. उलट, ज्या साहित्याला अभिजात आणि चिकित्सक वाचकवर्ग लाभतो, ते साहित्य उत्तम समजले पाहिजे. त्यामुळे नव्या कवींनी कोणत्याही प्रकारचे साहित्यलेखन करताना ‘लेखन ही आपल्या अभिव्यक्तीची गरज आहे,’ या जाणिवेतून लेखन करावे, असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभलेखक अजय कांडर यांनी केले.
कणकवली महाविद्यालयाच्या कनक नियतकालिक विभागातर्फे कविता, ललित आणि कथा या साहित्यप्रकारांवरील लेखन कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कवी अजय कांडर म्हणाले की, कवी किंवा लेखकाचा व्यक्तिगत संघर्ष जितका अधिक, तितकी उत्तम लेखन करण्याची शक्यता अधिक असते. सुख-शांतीचे जीवन जगत असताना उत्तम लेखन करणे कठीण असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी राजपत्रित अधिकारी सतीश लळीत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कविता लेखन या विषयावर कवी अजय कांडर, ललित लेखन या विषयावर ललित लेखिका व कवयित्री डॉ. सई लळीत, तर कथात्म साहित्य या विषयावर कथालेखक तथा प्रसिद्ध स्तंभलेखक प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी मार्गदर्शन केले. कविता लेखनाचे पहिले सत्र लेखक प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी कणकवली महाविद्यालयाचे पर्यवेक्षक महादेव माने उपस्थित होते.
कवी अजय कांडर पुढे म्हणाले की, चांगल्या कवितेचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे तिच्यात असलेल्या अर्थाच्या विविध शक्यता. कवितेमध्ये जितक्या अधिक शक्यता आणि जितके अधिक ‘अर्थाचे पदर’ असतात, तितकी ती कविता अधिक समृद्ध आणि दीर्घायुषी ठरते. कवी म्हणून आपण एखादा आशय मांडतो; मात्र त्या आशयाच्या अनेक शक्यता शोधणे आणि त्याला खुले ठेवणे, हेही कवीच्या कामाचा भाग आहे. कविता एकाच अर्थामध्ये, एका चौकटीत बंदिस्त झाली तर ती लवकर संपते; परंतु ती नवनव्या अर्थांना जन्म देत राहिली आणि प्रत्येक वाचकाला नव्याने भेटत राहिली, तर तिचा प्रवास पुढे सुरू राहतो. त्यामुळे ती जिवंत राहते.
कविता लिहिणे ही केवळ सौंदर्यनिर्मिती किंवा अभिव्यक्तीची बाब नाही. कवी म्हणून आपण कोणत्या भूमिकेतून जगतो, कोणत्या मूल्यांवर उभे असतो आणि कोणत्या बाजूने उभे राहतो, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या कवीची लेखनभूमिका डळमळीत झाली किंवा त्याची नैतिकता घसरली, तर त्याचा परिणाम त्याच्या कवितेवरही होतो. शब्द आणि जगणे वेगळे असू शकत नाही. माणूस म्हणून आपल्याकडून चुका होऊ शकतात; मात्र त्या चुका मान्य करण्याची प्रामाणिकता आणि हिंमत आपल्यात असली पाहिजे. कवीने स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पैशासाठी, पुरस्कारासाठी किंवा पदासाठी लाचार होणे योग्य नाही. अन्यथा तो केवळ ‘मागणी तसा पुरवठा’ करणारा लेखक ठरेल, असेही कांडर यांनी सांगितले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, ज्येष्ठ अभ्यासक व माजी सनदी अधिकारी सतीश लळीत तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच
मान्यवरांच्या हस्ते प्रा. अमरेश सातोसे, प्रा.दीपा तेंडोलकर, प्रा. डॉ .रामदास बोलके यांच्या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा हडकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विजयकुमार सावंत यांनी केले, तर आभार प्रा. माधुरी राणे यांनी मानले. यावेळी प्रा.स्विटी जाधव, प्रा. विजय सावंत,कनक नियतकालिक विभागातील प्राध्यापक तसेच कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा