शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार थेट हक्काची बाजारपेठ: सभापती हर्षदा वाळके,उपसभापती सोनू सावंत यांनी दिली माहिती
कणकवली,दि.१३ जून
कणकवली पंचायत समिती आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली पंचायत समिती जुनी इमारत येथे गावठी आठवडा बाजार सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन सोमवार १५ जून रोजी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिली.
कणकवली पंचायत समितीच्या सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी वालावलकर, पंचायत समिती सदस्य गुरूनाथ वर्देकर, राजेश जाधव ,गुरुनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या शेतात उत्पादित होणारा भाजीपाला, कुळीथ पीठ, विविध मसाले तसेच घरगुती खाद्यपदार्थांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाचे प्रयत्न शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी असून गावठी आठवडा बाजार त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
हा बाजार दर शुक्रवारी भरविण्यात येणार असून सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहील. बाजारासाठी पंचायत समितीच्या शेडमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत ४० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून जिल्हाभरातील शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत.
विशेष म्हणजे, सलग तीन आठवडी बाजारात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना एक नवी बाजारपेठ उपलब्ध होणार असून ग्राहकांनाही ताजा व दर्जेदार गावठी माल एकाच ठिकाणी मिळणार आहे.असे सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले.