कणकवली : फोंडाघाट आयटीआयमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

शेअर करा

कणकवली,दि.०५ जुन

फोंडाघाट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्या डिजिटल कॉम्प्युटर लॅबमध्ये विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींसाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करताना वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असल्याची बाब अधोरेखित केली. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याचा अपव्यय रोखणे तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी राहुल कडे यांनी कौशल्य विकास आणि पर्यावरण संरक्षण यांची सांगड घालण्याची गरज व्यक्त केली. संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य मुराद बटवाले यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ लिपिक सुकेशिनी शार्दुल, कनिष्ठ लिपिक लक्ष्मण आसोलकर, मयुरेश पराडकर, राहुल पाटील, भास्कर पाटील, सतीश मेस्त्री, स्वप्नील विश्वंभारे, गणेश मराठे, सायली तळवडेकर तसेच सुरज आचरेकर आणि रामचंद्र इस्वलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


निदेशक अभिषेक जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वप्नील विश्वंभारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली.

शेअर करा