कणकवली ,दि.१६ जून
सोशल मीडियावर ओळखीनंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याच्या गुन्ह्यात वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावातील तरुणावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर प्रकाश बंदरकर (वय २८, रा. तिथवली, ता. वैभववाडी) असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवार १५ जून रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी किशोर आणि पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर फेब्रुवारी २०२६ मध्ये ओळख झाली. त्यानंतर चॅटिंग दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. किशोर याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. पीडित तरुणी ही मुंबईत खाजगी नोकरी करते. एप्रिल २०२६ मध्ये पीडित तरुणी आपल्या गावी आली होती. दरम्यान १० एप्रिल रोजी आरोपी किशोर याने पीडित तरुणीला कणकवली शहरानजीकच्या एका लॉजमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर पीडितेने लग्नाबाबत विचारले असता किशोर याने लग्नास नकार दिला. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला म्हणून पीडितेने किशोर बंदरकर याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. किशोर विरोधात बी एन एस चे कलम६४,६९,७५(२),३५२,३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत.
किशोर बंदरकर याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.