भातशेतीसह चिबुड फळांचे नुकसान
कुडाळ,दि.१३ ऑगस्ट
कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात सध्या गवारड्यांच्या कळपाने धुमाकुळ घातला आहे. शेतकरी सध्या गवारेड्याच्या त्रासाला वैतागले आहेत. या भागात सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भातशेती केली आहे. शेतकरी अथक परिश्रम काबाडकष्ट करून उन्हाळी भातशेती करतात. परंतु, वन्यप्राणी मात्र भात शेतीचे नुकसान करीत आहेत. कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी येथील शेतकरी सुभाष तेंडोलकर यांच्या भातशेतीत घुसून सात ते आठ गवारेड्याच्या कळपाने बुधवारी रात्री भातशेती खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच चिबूड उत्पादक नंदकिशोर सर्वेकर व संदीप वारंग यांचे चिबूड खाऊन गवारेड्यानी उद्धस्थ केले.
या परिसरात सध्या सात ते आठ गवारेड्यांचा कळप दिवसाढवळ्या लोकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे तेथील शेतकरी भीतीच्या छायेत आहेत.
गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गेली दोन वर्षे गवारेड्यांचा कळप वावरत आहे. सुरुवातीला या गवारेड्यांची संख्या कमी होती. मात्र अलीकडेच या गवारेड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोवेरी-म्हारसेवाडी येथील परिसरात शेतकरी सुभाष तेंडोलकर यांनी एक दीड एकर क्षेत्रात खूप मोठ्या मेहनतीने भात शेती केली आहे. मात्र गवारेड्यांच्या कळपाने एका रात्रीत या भात शेतीचे नुकसान केले.
भात शेतीची गवारेड्यानी अक्षरशा नासधूस केली आहे. मोठ्या मेहनतीने तेंडोलकर कुटुंबीयांनी मोठे काबाडकष्ट करून भात शेती केली. परंतु असे रानटी प्राणी अशी नासधूस करू लागले तर आम्ही करायचे तरी काय? असा सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे.
त्यांनी केलेली शेती पुर्ण वाया गेली आहे. गवारेड्यानी केलेले नुकसान तेंडोलकर कुटुंबीयांना पाहावत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गवारेड्याना रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही. तेंडोलकर कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने गवारेड्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. नुकसानीचे पंचनामे करून लवकरात-लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तेंडोलकर यांनी केली आहे.