कुडाळ : अखेर पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात

शेअर करा

कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी १ च्या सुमारास मगरीला जेरबंद

भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी

कुडाळ,दि.२५ ऑगस्ट

पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने (आरआरटी टीम) आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल (सोमवार) दुपारपासून सुरू असलेले बचावकार्य आज दुपारी संपले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.


भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या मुलाला काल (सोमवारी) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर काही क्षणांतच ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच गोंधळपूर पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर ग्रामपंचायत सदस्य आयाज खुल्ली व मंगेश चव्हाण यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. सरपंचांनी तातडीने सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक व्यवस्था केली.


यानंतर वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, अग्निशमन एमआयडीसी आणि कुडाळ नगरपंचायत अग्निशमन सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही रेस्क्यू पथकाला पूर्ण सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. मात्र, पाणी वाढल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. तलाव खोल असल्यामुळे व पाणी जास्त असल्याने मगर पकडणे अवघड जात होते. त्यामुळे तलावातील पाणी मड पंपच्या सहाय्याने कमी करून परत बचावकार्य सुरू करण्यात आले. तलावाचे एकाबाजूने पाणी प्रवाह सुरूच असल्याने आणि तलावामध्ये बराच गाळ असल्याने बचावकार्यात खूप अडथळे येत होते. तरी देखील २ दिवासपासून जवळपास ५/६ तास नंतर मगरीस पकड्यांत आरआरटी टीम व वनक्षेत्रपाल कार्यालय कुडाळ चे कर्मचारी यांना यश आले. सदर बचाव कार्यामध्ये पिंगुळी ग्रामस्थ यांचे देखील सहकार्य लाभले. मगरीची कुडाळ पशूवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी केली असता कोणतीही इजा अथवा जखम झाली नसल्याची खात्री केल्यानंतर नैसर्गिक अधिवास सोडण्यात आले.
सदर कार्यवाही उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा, सहायक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनात चेतन पाटील (वनक्षेत्रपाल कुडाळ), सूर्यकांत सावंत (वनपाल नेरुर), समीर खरवत (वनरक्षक नेरुर), सागर भोजने (वनरक्षक तुळस) यांच्या उपस्थित जलद बचाव पथक अनिल गावडे, प्रसाद गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, दिवाकर बांबर्डेकर, संतोष इब्रामपुरकर, यशवंत कदम आणि राहुल महेकर यांनी बचावकार्य केले. सदर अत्यंत कठीण व जोखमीचा बचावकार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

शेअर करा