कुडाळ : “लालपरी” ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शेअर करा

प्रवाशांच्या उपस्थितीत कुडाळ एसटी स्थानकावर बसची पूजा करून कापला केक

कुडाळ,दि.०१ जुन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे “लालपरी” एसटीचा आज ७८ वा वर्धापन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुडाळ आगारात एसटी बस सजवून आणि केक कापण्यात आला. यावेळी कुडाळ एसटी आगाराचे प्रमुख रोहित नाईक, एसटीचे अधिकारी, चालक-वाहक, अन्य कर्मचारी आणि प्रवासी, एसटीमित्र जयराम डिगसकर यांच्यासहित मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्वाची सेवा देणारी पहिली एसटी बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर १ जून १९४८ रोजी धावली. राज्य परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त आज, १ जूनपासून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच यंदा ७८ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाशांना एसटीतील सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. दोन ते १० रुपये घेऊनही एसटी स्थानक, आगारातील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. स्थानक-आगार परिसरात अस्वच्छता आणि पाणपोईंची दुरवस्था आहे. यामुळे प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानक आणि आगार परिसराची दर चार तासांनी स्वच्छता, दुर्लक्षित पाणपोई पुन्हा सुरू करणे, तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बद्दल दोन महिन्यांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घोषणा केली होती. यापूर्वी स्वच्छतागृहांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला दिली होती. तरी अस्वच्छतेच्या तक्रारी कायम होत्या. आता ही व्यवस्था बंद झाली आहे. स्वच्छतागृहांच्या देखभालीची आणि सर्व सुविधा देण्याची जबाबदारी पूर्णपणे एसटी महामंडळाकडे सोपवली गेली आहे. यामुळे सर्व आगारात एक समान सेवा पुरवल्या जाणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा :
प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवासावेळी होणारा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे. त्याशिवाय स्वच्छतागृहांमध्ये सुविधा आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यावरही भर दिला जाणार आहे. दरम्यान, प्रवशांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रमुख बस डेपोंमध्ये मोफत पिण्याच्या पाण्याचे स्थानके उभारण्याचीही महामंडळाची योजना आहे. यामुळे एसटी प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रवाशांना कमीत-कमी खर्चात आरामदायी प्रवास आणि सोयी-सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
त्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. याशिवाय एसटीचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात ८००० नव्या बससे येणार आहेत.

एसटीच्या सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा: रोहित नाईक (कुडाळ आगारप्रमुख)
कुडाळ बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमावेळी आगारप्रमुख
रोहित नाईक म्हणाले की, कालच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांना भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील देवगड, कणकवली, सावंतवाडी ही स्थानके वेगळ्या पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. महामंडळात असणारे अपुरे कर्मचारी, एसटी बसेस तुटवडा, स्थानकांवरील स्वच्छता याला प्राधान्य देण्यात येईल. प्रवाशांनी अधिकाधिक एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेअर करा