कुडाळ : आकेरी उंचवळा येथे चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर झाड कोसळले;चालक गंभीर जखमी

शेअर करा

कुडाळ, दि. २९ मे
कुडाळ तालुक्यातील आकेरी उंचवळा येथे गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास चालत्या टेम्पो ट्रॅव्हलरवर अचानक आकेशियाचे मोठे झाड कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनचालक गंभीर जखमी झाले असून वाहनातील इतर सुमारे १७ प्रवाशी प्रवासी बालंबाल बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंगुळी गुढीपूर येथील काही नागरिक टेम्पो ट्रॅव्हलरमधून अक्कलकोट येथे जात होते. आकेरी उंचवळा परिसरातून वाहन जात असताना रस्त्यालगत असलेले आकेशियाचे झाड अचानक वाहनावर कोसळले. झाड थेट वाहनाच्या पुढील भागावर पडल्याने चालक गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी चालकाला बाहेर काढले. त्यानंतर त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले.
दरम्यान, वाहनातील इतर प्रवासी सुदैवाने थोडक्यात बचावले. या दुर्घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आकेशियाच्या झाडाला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. झाडाच्या मुळांचा भाग जळाल्याने झाड कमकुवत झाले होते. विशेष म्हणजे, कोणतेही वादळी वारे नसताना झाड अचानक कोसळल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. गाडीवर पडलेले झाड हे मोठ्या आकाराचे होते. हे प्रवासी बसलेल्या भागात पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र आतील प्रवाशांचे दैव बलत्तर असल्याने ही मोठी दुर्घटना होता होता टळली.
या भागात आगीत अर्धवट जळालेली अनेक धोकादायक झाडे आजही उभी असून दरवर्षी अशा झाडांमुळे रस्त्यावर दुर्घटना घडत असल्याचा आरोप वाहनधारकांनी केला आहे. दरवर्षी या भागातील धोकादायक झाडांचा अहवाल संबंधित प्रशासनाकडे पाठवला जातो. मात्र हे धोकादायक हटवण्याबाबत कोणतीही योग्य ती कार्यवाही केली जात नाही. असा आरोप वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा करत आहे का असाही आरोप वाहनधारकांमधून करण्यात आला आहे. संबंधित विभागाने वेळेत धोकादायक झाडे हटविण्याची कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

शेअर करा