माहिती मिळताच महिला पोलिसांनी तात्काळ धाव घेत केली मदत; वेळीच हस्तक्षेप करत तरुणीची सुरक्षितता सुनिश्चित 🚔👮♀️🤝
कुडाळ,दि. २० जून
झाराप तिठा ते माणगाव जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री एक तरुणी एकटीच झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संबंधित तरुणीला सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २:५५ वाजण्याच्या सुमारास झाराप तिठा परिसरात एका महिलेबाबतची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. प्रकरण महिला संदर्भातील असल्याने ठाणे अंमलदार महिला पोलीस हवालदार वेदिका गावडे यांनी तत्काळ दखल घेत कारवाई सुरू केली.
यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यातील रिझर्व तपासी अंमलदार एएसआय कोळेकर व पोलीस कर्मचारी चव्हाण यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता, सुमारे २० वर्षीय तरुणी रस्त्याच्या कडेला एकटी झोपलेल्या अवस्थेत आढळून आली.
प्राथमिक विचारपूस केली असता संबंधित तरुणीकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला कुडाळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांनी पुढील चौकशी केली असता तिने स्वतःची ओळख सांगितली.
चौकशीत संबंधित तरुणीचे दोन वर्षांपूर्वी विवाह झाल्याचे तसेच ती सध्या पती व आई-वडिलांसोबत गोवा येथे राहत असल्याचे समोर आले. तिने कौटुंबिक कारणांमुळे आणि सतत होत असलेल्या त्रासामुळे तेथे राहण्याची इच्छा नसल्याचे पोलिसांना सांगितले.
तरुणीची परिस्थिती लक्षात घेऊन तिच्या निवारा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत तिला महिला वस्तीगृहात दाखल केले.
या संपूर्ण घटनेत कुडाळ पोलिसांनी संवेदनशीलता आणि तत्परता दाखवत संबंधित तरुणीला सुरक्षित आश्रय उपलब्ध करून दिला.