मालवण : ओझर येथे श्री ब्रह्मानंद स्वामींचा ५३ वा पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात संपन्न

शेअर करा

हजारो भाविकांची उपस्थिती; श्री ओझरेश्वर पूजन, श्री स्वामी ब्रह्मानंद महाराज प्रतिमा पूजन व श्री सत्यनारायण महापूजेसह विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले. 🙏🌺🪔

मालवण,दि. २० जून

मालवण तालुक्यातील प्रसिद्ध अशा ओझर येथील श्री ब्रह्मानंद स्वामी यांचा ५३ वा पुण्यतिथी सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटे पाच वाजता कमलाकर गावकर यांच्या हस्ते श्री ओझरेश्वराची विधीवत पूजाअर्चा केल्यानंतर श्री स्वामी ब्रह्मानंद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली.

मालवण ओझर रस्त्यावर ओझर याठिकाणी श्री ब्रह्मानंद स्वामींचे समाधी स्थान आहे. कर्नाटकातील शिवावतार श्री स्वामी नित्यानंद यांचे श्री ब्रह्मानंद स्वामी हे शिष्य होते. गुरु आज्ञा वरून श्री ब्रह्मानंद स्वामी हे १९४१ साली तपश्चर्येसाठी ओझर येथे आले. त्यानंतर उपदेशाने व प्रसंगी केलेल्या लीलांमुळे त्यांचे हजारो भक्तगण झाले. जून १९७३ मध्ये विलेपार्ले मुंबई येथे ब्रह्मानंद स्वामींचे महानिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थीचा कलश ओझर येथे आणून त्यावर समाधी बांधण्यात आली. याठिकाणी पाण्याची दोन कुंडे असून एक गुहा आहे. ओझर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याने ते धार्मिक पर्यटन स्थळ नावारूपाला आले आहे.

ब्रह्मानंद स्वामींच्या आजच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने दुपारपासून रात्री पर्यंत महाप्रसादाचा तसेच भजनाचा कार्यक्रम पार पडला. हजारो भाविक या सोहळ्यास उपस्थित राहून श्री ओझरेश्वर तसेच ब्रह्मानंद स्वामींच्या समाधी स्थळावर नतमस्तक झाले.

शेअर करा