मालवण ; भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला मालवण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा

शेअर करा

पालकमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष यांना सादर करणार अहवाल

मालवण,दि.०२ ऑक्टोंबर

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार गेल्या दोन दिवसांपासून भाजप पदाधिकाऱ्यांकडून मालवण तालुक्यातील विविध भागांत शेती, जलसाठे यांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थ यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यात येत आहेत. या पाहणीचा अहवाल पालकमंत्री नितेश राणे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण तालुका पिंजून काढत जिल्हा परिषद मतदार संघनिहाय विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत. यामध्ये देवबाग मतदार संघातील देवली, मसुरे मतदार संघातील हडी, आचरा मतदार संघातील हिर्लेवाडी, आडवली मतदार संघातील हिवाळे, सुकळवाड मतदार संघातील नांदोस, पेंडूर मतदार संघातील वराड गावात भेट देण्यात आली. या भेटीत भाजप पदाधिकाऱ्यांनी शेतामध्ये जाऊन भात पीक व इतर पिकांची पाहणी केली. तसेच जलसाठ्यांची पाहणी केली. तर काही ठिकाणी उद्भवणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन तेथील जल स्रोतांच्या ठिकाणी बंधारे बांधण्याच्या दृष्टीनेही शेतकरी व ग्रामस्थांशी विचार विनिमय करण्यात आला.

या पाहणी दरम्यान भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जि.प. सदस्या क्षमा हडकर, पंचायत समितीचे उपसभापती शाम झाड, पं. स. सदस्य दीपक सुर्वे, पं. सदस्या सीमा परुळेकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, महेश मांजरेकर, माजी उपसभापती राजु परुळेकर, माजी जि. प. सदस्य महेंद्र चव्हाण, देवली सरपंच शाम वाक्कर, पेंडुर उपसरपंच सुमित सावंत, वायंगणी उपसरपंच ऍड. समृद्धी आसोलकर, अरुण परब, पूजा वेरलकर, शिल्पा खोत, बंडू गावडे, रोहेश गावकर, सुशांत सुर्वे आदी व इतर उपस्थित होते.

या पाहणी नंतर बोलताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, १९७२ नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ सध्या जाणवत आहे. शेती हिरवी दिसत असली तरी जमिनीत पाणी नसल्याने या शेतीचे नुकसान होऊ शकते. तसेच आता पाऊस पडला तरीही या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती आहे. तसेच पाऊस कमी झाल्याने अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गावागावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या असून या पाहणीचा अहवाल आम्ही पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करणार आहोत, तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून पाणी अडविण्यासाठी विविध ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत, असेही चिंदरकर यांनी सांगितले.

वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाबरोबर आम्ही पदाधिकारी, कार्यकर्तेही सर्व ठिकाणी जाऊन पाहणी व पंचनामे करत आहोत. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच गांभीर्याने लक्ष घातले असून त्यांच्या सूचनेनुसार प्रशासन दुष्काळ निवारणासाठी कार्यरत आहेत. तसेच खासदार नारायण राणे यांनीही संवेदनशीलतां दाखवत जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई वर उपाययोजना करण्यासाठी पाणी फाउंडेशन या संस्थेशी चर्चा केली आहे. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या बिकट परिस्थितीत भाजपचे सर्व वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असेही धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

शेअर करा