मालवण : मालवण शहरातील मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

शेअर करा

ज्येष्ठ नागरिकांची आम. निलेश राणेंकडे मागणी

मालवण, दि. १९ जून

मालवण शहरात मोकाट गुरे व कुत्रे यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत मालवण नगरपालिकेचे वारंवार लक्ष वेधून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून मोकाट गुरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मालवण धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक लिलावती नारायण परब व कमलाकर खोत यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालवण शहरात विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदार निलेश राणे यांची ज्येष्ठ नागरिक कमलाकर खोत आणि लिलावती परब यांनी भेट घेऊन निवेदन सादर करत मोकाट गुरे व कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाबाबत व्यथा मांडली.

मालवण शहरात मोकाट गुरांचा संचार वाढला असून त्यांच्याकडून शेतीची नासधूस होत आहे. मोकाट गुरांची संख्या सातत्याने वाढतीच राहिली आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचा उच्छाद देखील वाढला असून आता पर्यंत २९८ लोकांना कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत मालवण नगरपालिकेचे गेली अनेक वर्षे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र नगरपालिका हा विषय गांभीर्याने घेत नसून याबाबत कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आमदारांनी या समस्येबाबत लक्ष घालून मोकाट गुरे व कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी कमलाकर खोत व लिलावती परब यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे केली आहे.

शेअर करा