डॉ. भागवत कराड यांचा मालवण व्यापारी संघातर्फे सत्कार
मालवण ,दि.२२ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, फणस, कोकम अशा येथे उत्पादीत होणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग व्यावसाय निर्माण झाले पाहिजेत, त्यांच्या उत्पादनांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल मार्केटिंग होणे महत्वाचे आहे. अशा उद्योगांना चालना देण्यासाठी व त्यादृष्टीने शासकीय योजना राबविण्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करू, या उद्योग व्यावसायांसाठी पुढच्या पिढीला सक्षम करावे लागेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व माजी खासदार डॉ. भागवत कराड यांनी मालवण येथे व्यापाऱ्यांशी संवाद साधताना केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासगी दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व माजी खासदार डॉ. भागवत कराड यांचा आज मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण व्यापारी संघातर्फे संवाद सभा व सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. कराड यांचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या करविषयक महत्वाच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले होते, त्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल ऋतज्ञता व्यक्त करण्यासाठी मालवण व्यापारी संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रामभाऊ भोगले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन डॉ. कराड यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ. अंजली कराड, मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष दिपक भोगले, जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके, डॉ. सोमवंशी, जिल्हा व्यापारी महासंघांचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, विजय केनवडेकर, सुहास ओरसकर, अभय कदम, गणेश प्रभुलकर, नाना साईल, रविकिरण तोरसकर, प्रसाद पारकर, प्रमोद नलावडे, मधू नलावडे, पी.डी.शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, राजन नाईक, अमित भोगले, पुजा वाडकर, आकांक्षा शिरपुटे आदी व इतर उपस्थित होते. यावेळी नितीन वाळके यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना डॉ. भागवत कराड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला एक मजबूत आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखविले आहे. त्यादृष्टीने भारत देश वाटचाल करत आहे. यामध्ये व्यापार हा महत्वाचा भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना येथील आंबा, काजू, फणस, कोकम अशा विविध उत्पादीत मालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण झाले पाहिजेत. येथील भूमिपुत्रांना ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून सोडविण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. या जिल्ह्यात खास नारायण राणे व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या सारखी मोठी माणसे आहेत, त्यांच्यासोबत मी देखील खारीचा वाटा उचलेन. येथील चिपी विमानतळावरून मुंबई साठी विमान सेवा सुरु होण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न मी करेन असे यावेळी डॉ. कराड म्हणाले. यावेळी रामभाऊ भोगले यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले.