जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा; अॅड. गीता काळे आणि आनंद रावले यांची माहिती
मालवण,दि.१७ ऑक्टोंबर
ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रातील तीन पक्क्या बंधाऱ्यांमध्ये पाणी न अडविल्यामुळे दि. २२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वरची गुरामवाडी ग्रामस्थ अॅड. गीता काळे व श्री. आनंद रावले यांनी दिला आहे.
याबाबत अॅड. गीता काळे व श्री. आनंद रावले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रात सन २०१६ मध्ये रक्कम रुपये २४,९३,१३५/- निधी खर्च करुन वाईरकरवाडी येथे बंधारा बांधण्यात आला. तसेच सन २०१९ मध्ये रक्कम रुपये १७,८५,३२१/- एवढा निधी खर्च करुन तेलीवाडी उभाधोडा येथे बंधारा बांधण्यात आला. सदरचे दोन बंधारे देखभाल व दुरुस्तीसाठी अध्यक्ष, पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्या. पेंडूर यांच्या ताब्यात दिलेले आहेत. तसेच सन २०२१ मध्ये ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रात बाजारपेठ कट्टा येथे रक्कम रुपये १८,१२,०८८/- एवढा निधी खर्च करुन बंधारा बांधण्यात आला. सदरचा बंधारा सरपंच, ग्रामपंचायत वरची गुरामवाडी यांच्या ताब्यात दिलेला आहे.
या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जावे यासाठी मागील तीन वर्षे पेंडूर विकास सोसायटी, ग्रामपंचायत वरची गुरामवाडी व लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे विनंती अर्ज करून देखील त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. किंबहुना बंधारे बांधल्यानंतर त्यामध्ये आजवर एकदाही पाणी अडविले गेलेले नाही असे अॅड. काळे यांनी म्हटले असून त्यामुळे बंधाऱ्यासाठी खर्च केलेला लाखो रुपये निधी वाया गेला आहे, असा आरोप केला आहे.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये झाला आहे. गावात बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधाऱ्यांमध्ये दरवर्षी नियमितपणे पाणी अडविले गेले असते तर गावाला दुष्काळाच्या झळा बसल्याच नसत्या असे कृषिमित्र श्री. आनंद रावले यांनी म्हटले आहे.
त्यामुळे किमान यावर्षी तरी गावातील पक्क्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जावे असे विनंती अर्ज अॅड. काळे यांनी ग्रामपंचायत व पेंडूर विकास सोसायटीकडे यापूर्वीच दिले आहेत. परंतु अद्याप त्याची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रातील तीन पक्क्या बंधाऱ्यांना प्लेटस टाकून पाणी अडविण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. २२ ऑक्टोबर रोजी उपोषणास बसणार असल्याचे अॅड. गीता काळे व श्री. आनंद रावले यांनी म्हटले आहे.