मालवण,दि.३१ मे
मालवण तालुक्यातील सेवास्पर्श फाउंडेशनच्या वतीने ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हा स्वच्छता उपक्रम रविवारी यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कट्टा बाजारपेठ ते सुकळवाड वरचा नाका या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या प्लास्टिक कचऱ्याची साफसफाई करत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील उद्योजक व सेवास्पर्श फाउंडेशनचे सक्रिय सदस्य केशव उर्फ आप्पा भिसे यांनी कट्टा ते सुकळवाड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची संकल्पना मांडली होती. या समाजोपयोगी उपक्रमाला फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी तत्काळ प्रतिसाद देत रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
या मोहिमेस जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, उद्योजक देवेन ढोलम, वराड सरपंच शालाका रावले, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, चौके येथील उद्योजक बिजेंद्र गावडे तसेच तिरवडे उपसरपंच सुशील गावडे यांचे सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे या मोहिमेत महिला वर्ग, युवक तसेच लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कडक उन्हाची पर्वा न करता नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात साचलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर सामूहिक प्रयत्नातून उपाय करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी प्रत्येक गावाने अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास तालुका आणि जिल्हा स्तरावर प्लास्टिकमुक्तीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला.