मालवण,दि. २० जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दि. १७ व १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘नाट्यरंग – रघुनाथ कदम स्मृती उत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गच्या रंगभूमीवर गेली पंचवीस वर्षे एक सावली, एक प्रेरणा आणि एक सर्जनशील शक्ती म्हणून उभं राहिलेलं नाव म्हणजे रघुनाथ (रघु काका) कदम होय. दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या अकाली निधनाने सिंधुदुर्गच्या नाट्यविश्वात निर्माण झालेली पोकळी आजही प्रत्येक रंगकर्मीला जाणवते. महाविद्यालयीन, हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील सातशेहून अधिक कलाकारांना रघुनाथ कदम यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि रंगभानाची नवी दृष्टी दिली. नाटक, एकांकिका, दीर्घांक, काव्याचे नाट्यरूपांतर, प्रयोगशील नाट्यसादरीकरण आणि नव्या पिढीतील कलाकार घडवण्याची त्यांची धडपड आजही अनेकांच्या कामातून जिवंत आहे. त्यांच्या या असामान्य रंगप्रवासाला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १७ ऑक्टोबर आणि रविवार दि. १८ ऑक्टोबर या दोन दिवसांत ‘नाट्यरंग – रघुनाथ कदम स्मृती उत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम श्रद्धांजलीचा नसून रघुनाथ कदम यांनी घडवलेल्या रंगसंस्कारांचा उत्सव आहे. रघुनाथ कदम यांनी प्रज्वलित केलेल्या रंगसंस्काराचा दीप नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असेल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.
या दोन दिवसीय सोहळ्यात रघुनाथ कदम यांनी दिग्दर्शित केलेल्या व गाजलेल्या नाटकांतील निवडक दृश्यांचे सादरीकरण, त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपट, त्यांच्या सहवासातील आठवणी, अनुभवकथन, चर्चासत्रे, व्याख्याने, मुक्त संवाद आणि कलात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले कलाकार, तसेच मराठी चित्रपट, व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमीवरील अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी होऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.
कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची घोषणा लवकरच करण्यात येईल. या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक राजेंद्र (राजू) कदम (मालवण) हे असून, रघु काकांशी संबंधित सर्व संस्था, रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि त्यांच्या सहवासातील मित्रपरिवार यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व आपले योगदान नोंदविण्यासाठी राजेंद्र कदम (9422436908 / 9975545490) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.