Malvan news : जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत मालवणच्या विद्यार्थिनींची घवघवीत कामगिरी!

शेअर करा

ओरोस येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवले यश!

मालवण,दि.२४ ऑक्टोंबर

क्रीडा व युवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित १९ वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत १५०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात कोमल गावडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर
अंबिका चव्हाण हिने ८०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच ४ × ४०० मीटर रिले मध्ये रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या संघात अंबिका बापू चव्हाण, ममता आनंद थवी, कोमल अनिल गावडे, सृष्टी सुनीलकुमार कदम यांचा समावेश होता. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींची विभाग स्तरावर निवड झाली असून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या संघाचे व्यवस्थापन प्रा. अन्वेशा कदम यांनी पाहिले.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा