जुन्या इमारतीच्या जागी दुमजली रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव;रिक्त पदे भरण्याचेही आश्वासन
मालवण,दि.१८ ऑक्टोंबर
मालवण शहर व तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. आरोग्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी काल ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासह विविध आरोग्यविषयक प्रश्नांचा आढावा घेतला. सध्याच्या रुग्णालयाच्या जागेवर जुन्या इमारतीचे बांधकाम पाडून दुमजली उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णालयातील रिक्त पदे नजीकच्या शासन भरतीत भरण्याचे आश्वासनही देण्यात आले.
या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील, तहसीलदार गणेश लव्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील उपस्थित होते.
मालवणमध्ये ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी जागेच्या उपलब्धतेवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शहरातील शासकीय पॉलिटेक्निक, कुंभारमाठ येथील पाच इमारती रिक्त असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मात्र, उपजिल्हा रुग्णालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच असावे, अशी भूमिका जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी मांडली. शहरात किंवा शहरालगत उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली चार ते पाच एकर शासकीय जागा उपलब्ध नसल्याचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी स्पष्ट केले.
मालवण हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि विकसित होत असलेले शहर असल्याने येथे उपजिल्हा रुग्णालयाची गरज असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत सध्याचे ग्रामीण रुग्णालय सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेतील हॉल किंवा भाडेतत्त्वावरील जागेचा पर्याय विचारात घेण्याचे ठरविण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या नकाशाच्या आधारे नवीन इमारतीच्या बांधकामाचा आराखडा समजावून सांगितला. सध्याची लोड बेअरिंग पद्धतीची इमारत पाडून त्या जागी दुमजली ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणे योग्य ठरेल, अशी चर्चा झाली. या रुग्णालयाचा ५० खाटांचा प्रस्ताव मंजूर करून देण्याबाबत डॉ. स्वप्नील सांगळे यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि लिपिक संवर्गातील रिक्त पदांचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. ही पदे नजीकच्या शासन भरती प्रक्रियेत भरण्याचे आश्वासन देण्यात आले.
रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या (MJPJAY) शिल्लक निधीतून डायलिसिस तंत्रज्ञ आणि संगणक परिचालक यांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची सूचनाही करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती सेवांचा आढावा घेताना सामान्य प्रसूतींचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. अत्यावश्यक औषधांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याबाबतही सांगण्यात आले. तसेच १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांसंदर्भातील प्रश्नांवर वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मालवण हे समुद्रकिनारी वसलेले पर्यटनस्थळ असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. समुद्रकिनाऱ्यांवरील अपघात, बुडण्याच्या घटना आणि अन्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता पर्यटकांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा आणि कोस्टल ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी केली. या मागणीला डॉ. स्वप्नील सांगळे यांनी अनुमोदन दिले. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी नेत्रशस्त्रक्रिया सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. मालवणच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने झालेल्या या बैठकीत उपजिल्हा रुग्णालय, मनुष्यबळ, रुग्णवाहिका आणि पर्यटकांच्या आरोग्य सुविधांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले.