मालवण : मालवण तालुक्यातील मंडळे आंबा पीकविमा नुकसान भरपाईतून वगळली

शेअर करा

आंबा- काजू उत्पादक आक्रमक

मालवण ,दि.१५ जून

यावर्षी हवामानातील तीव्र बदलांमुळे मालवण तालुक्यातील आंबा आणि काजू उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही विमा कंपन्यांनी तालुक्यातील अनेक प्रमुख मंडळांना नुकसान भरपाईतून वगळून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित यांच्या वतीने तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत तहसीलदारांनी येत्या गुरुवारी सायंकाळी ४ वाजता शेतकरी, तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची एक संयुक्त तातडीची बैठक आयोजित करण्याचे मान्य केले आहे.

शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा आणि काजूचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. तरीही विमा कंपनीने मालवण तालुक्यातील मालवण, आंबेरी, आचरा, आणि कोळंब ही प्रमुख मंडळे आंबा पीकविमा नुकसान भरपाईतून पूर्णपणे वगळली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काजू पिकासाठी तर संपूर्ण मालवण तालुकाच नुकसान भरपाईतून बाद करण्यात आला आहे.

पीकविम्यासाठी वापरण्यात येणारी ‘स्कायमेट’ ही शासकीय यंत्रणा अत्यंत सदोष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही मंडळांमधील स्कायमेट कंपनीचे ट्रिगर आणि खासगी वेदर स्टेशनचे ट्रिगर यांच्या नोंदींमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. “पीकविमा योजना ही कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे की शेतकऱ्यांच्या?” असा संतप्त सवाल आता कोकणातील शेतकरी विचारत आहेत. अनेक वर्षे निसर्गाचा फटका बसूनही शेतकरी भरपाईपासून वंचित राहिल्याने अखेर यंदा त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.

आंब्यासाठी प्रति हेक्टरी सर्वाधिक ९५,२०० रुपये आणि काजूसाठी प्रति हेक्टरी ४२,००० रुपये इतकी भरपाई निश्चित आहे. त्यामुळे कुठल्याही मंडळावर अन्याय न करता सर्व बाधित शेतकऱ्यांना ही जास्तीत जास्त भरपाई मिळालीच पाहिजे. मच्छीमार बांधवांच्या धर्तीवर आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी सवलतीत पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे. सध्या बाजारपेठेत असलेल्या इंधन तुटवड्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन तहसीलदार गणेश लव्हे यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यांनी येत्या गुरुवारी सायंकाळी ४ वाजता तहसील कार्यालयात एक विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित विमा कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाचे उपाध्यक्ष संदेश मालवणकर, रत्नाकर कोळंबकर, अनिकेत फाटक, नीना मुंबरकर, आप्पा चव्हाण यांच्यासह सचिन नार्वेकर, महेश फाटक, संदेश फाटक, संतोष गांवकर व इतर अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी आणि विमा कंपनीला जाब विचारण्यासाठी मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी होणाऱ्या या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी प्रतिनिधींनी केले आहे.

शेअर करा