मालवण : शिवराज भूषण’ महानाट्य दिल्लीतील प्रयोग सिंधुदुर्गसाठी अभिमानाचा क्षण ठरणार – भूषण साटम

शेअर करा

मालवण,दि.२८ ऑगस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचा भव्य नाट्यमय आविष्कार असलेल्या आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात हाऊसफुल प्रयोगांची मालिका रचत रसिकांची मने जिंकणारे तसेच मालवणसह सिंधुदुर्गातील ७० स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘शिवराज भूषण’ भव्य ऐतिहासिक महानाट्याचा दहावा प्रयोग २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७. ३० वाजता, नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती या नाटकाचे निर्माते भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत देताना सिंधुदुर्गातील प्रायोगिक नाटक प्रथमच दिल्लीत सादर होत असून हा सिंधुदुर्गच्या कलाविश्वासाठी निश्चितच एक अभिमानाचा क्षण ठरणार आहे, असा विश्वासही श्री. साटम यांनी व्यक्त केला.

मालवण येथील हॉटेल रापण रियासत येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी निर्माते भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, कलाकार संजय शिंदे, भाऊ सामंत, समीर शिंदे, शुभदा टिकम, पूजा सरकारे, साक्षी मयेकर, संकेत कु्वेसकर, विवेक परब, उमेश परुळेकर, नितीन तोडणकर आदी उपस्थित होते.

यावेळी भूषण साटम म्हणाले, मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांच्या सशक्त अभिनय आणि नृत्यातून तसेच अभिनय आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ साधत हे महानाट्य रंगभूमीवर साकारले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नाट्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया व आशीर्वाद मिळवले आहेत. आता हेच कलाकार दिल्लीच्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि कविराज भूषण यांच्या ओजस्वी काव्याचा मिलाफ सादर करुन महाराष्ट्राची गौरवशाली संस्कृती राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला संचालनालय, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेत शिवराज भूषण हे महानाट्य आमंत्रित केले गेले आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथे होणाऱ्या या परिषदेत सुमारे अडीज तासाचे हे महानाट्य प्रथमच हिंदी भाषेत सादर होणार आहे. दिल्लीत सादर होणाऱ्या या प्रयोगासाठी नाटकाचे हिंदी भाषांतर करण्यासाठी तसेच नवीन तांत्रिक गोष्टी समाविष्ट करण्यासाठी कलाकार व तंत्रज्ञ यांनी मोठी मेहनत घेतली आहे, असे भूषण साटम यांनी सांगितले.

मालवणच्या भूमीतून आकाराला आलेल्या या महानाट्याचा प्रवास थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या परिसरात ‘शिवराज भूषण’ सादर होणे ही मालवण तसेच सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. मालवणच्या सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरेचा हा आवाज आता दिल्लीच्या भूमीत घुमणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर राजधानीत करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे. आपल्या मातीत घडलेली ही कलाकृती देशाच्या राजधानीत सादर करण्यासाठी सर्व कलाकार उत्साहाने तयारी करत आहेत, असे भूषण साटम म्हणाले.

महानाट्य व्यावसायिक असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची संकल्पना, त्यांचा संघर्ष, शौर्य आणि दूरदृष्टी नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न या महानाट्यातून करण्यात आला आहे. इतिहास, अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि दिमाखदार सादरीकरणाचा संगम असलेले हे महानाट्य प्रेक्षकांसाठी एक भव्य सांस्कृतिक अनुभव ठरत आहे, असेही श्री. साटम म्हणाले.

शेअर करा