मालवणच्या कुपेरी घाटीतील घटना
मालवण ,दि.०९ऑक्टोबर
भरगच्च प्रवासी असलेल्या एसटी बसमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने मालवण तालुक्यातील कुपेरी घाटीत गुरुवारी सायंकाळी घबराट उडाली. गाडीला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी दरवाजाकडे धाव घेत असताना या प्रकाराने गोंधळलेल्या एका युवतीने घाबरून खिडकीतून बाहेर उडी मारल्याने तिच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे .
दरम्यान, याच मार्गावरून प्रवास करणारे आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड यांनी प्रसंगावधान राखत जखमी युवतीला तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या बाबतचे अधिक वृत्त असे की, वेंगुर्ला येथून मालवणच्या दिशेने येणारी एसटी बस गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुपेरी घाटीतील चढावावर आली असता अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. बसचा वेगही कमी झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चालकाने तातडीने बस थांबवली आणि खबरदारी म्हणून गाडी बंद करून सीएनजी यंत्रणेचा स्विच बंद केला. मात्र, धूर येतच असल्याने बसमधील प्रवासी घाबरले. बस पूर्ण भरलेली असल्याने बाहेर पडण्यासाठी दरवाजाजवळ एकच गर्दी झाली.
याच गोंधळात बसच्या मागील बाजूस असलेल्या एका युवतीने घाबरून खिडकीतून बाहेर उडी मारली. जमिनीवर आपटल्याने तिच्या हाताला व पाठीला मार लागला. परिसरात अंधार आणि आजूबाजूला झाडीझुडपे असल्याने काही काळ नेमके काय घडले, हे कोणालाच समजत नव्हते.
दरम्यान, ओरोस येथे बैठक आटोपून कुंभारमाठ येथील घरी परतणारे आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड या मार्गावरून जात होते. बसजवळील गोंधळ पाहून त्यांनी आपले वाहन थांबवले आणि घटनेची माहिती घेतली. युवती जखमी झाल्याचे समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या चारचाकी वाहनातून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले.
जखमी युवती मालवण येथील रहिवासी असून ती कुडाळ येथे कामाला जाते. गुरुवारी सायंकाळी ती कुडाळहून मालवणकडे येण्यासाठी बसने निघाली होती. मात्र, काळसे होबळीचा माळ येथे तिची बस बंद पडली. त्यामुळे त्या बसमधील प्रवाशांनी मागून येणाऱ्या वेंगुर्ला-मालवण बसमध्ये प्रवेश केला. ही बसही सीएनजीवर चालणारी होती. प्रवाशांची संख्या वाढल्याने बस खचाखच भरली होती. पेंडूर मार्गे मालवणकडे येत असताना कुपेरी घाटीतील चढावावर हा प्रकार घडला.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते दादा नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. बसमधील अन्य प्रवाशांना दुखापत झाली आहे का, याची त्यांनी चालक व वाहकाकडे विचारपूस केली. दरम्यान, मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, मोहन वराडकर आणि निकीत वराडकर यांनीही घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी युवतीची विचारपूस केली. युवतीचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले होते.
एसटी बसमधून अचानक धूर का बाहेर पडला, याचे नेमके कारण समजू शकले नाही. सीएनजी बस असल्याने खबरदारी म्हणून गाडी तातडीने बंद करून स्विच बंद केल्याची माहिती चालकाने दिली. घटनेनंतर मालवण एसटी डेपोचे अधिकारी व कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. बंद पडलेली बस मालवण आगारात आणण्याची व्यवस्था सुरू होती.
या घटनेमुळे कुपेरी घाटी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आरोग्य सेवक लक्ष्मण नातेवाड यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी युवतीला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. त्यांच्या या मदतकार्याचे कौतुक होत आहे.