डॉ रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन
मालवण,दि.२१ ऑगस्ट
“प्रत्येक मागणीला होकार देण्याऐवजी योग्य वेळी ‘नाही’ स्वीकारण्याची सवय, तसेच अपयश आणि निराशेला सामोरे जाण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील मानसोपचार तज्ज्ञ, लेखक व समुपदेशक डॉ. रुपेश पाटकर यांनी कट्टा येथे बोलताना केले
कट्टा येथील वराडकर हायस्कूल आणि जूनियर कॉलेज येथे मानसोपचार तज्ज्ञ, लेखक व समुपदेशक डॉ. रुपेश पाटकर
यांचे विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्याबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक महेश भाट, सहाय्यक शिक्षक एकनाथ राऊळ बाळकृष्ण वाजंत्री आदी व इतर उपस्थित होते
प्रारंभी श्री राऊळ यांनी प्रास्ताविक केले तर पर्यवेक्षक महेश भाट यांनी डॉ. रुपेश पाटकर यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला
यावेळी डॉ. रुपेश पाटकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे विचार निर्माण होण्यामागील विविध कारणांवर तसेच अशा टोकाच्या परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासाचे आणि मोकळेपणाने व्यक्त होता येईल असे वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कुमारवयात निर्माण होणारे आकर्षण, मैत्री, प्रेम आणि भावनिक अवलंबित्व यामधील फरक विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे असे सांगून त्यांनी भावनेच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय न घेता आपल्या भावनांना ओळखणे, त्या समजून घेणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त व हाताळणे ही भावनिक बुद्धिमत्तेची महत्त्वाची कौशल्ये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या मनातील भावना आणि अडचणी समजून घेण्याची गरज आहे, असेही डॉ. पाटकर यांनी स्पष्ट केले. शेवटी सहाय्यक शिक्षक श्री बाळकृष्ण वाजंत्री यांनी आभार मानले