कॉलेज युवक-युवतींनी भारताचे भविष्य घडवावे : डॉ. शिल्पा झाट्ये
मालवण,दि.२४ ऑगस्ट
“कॉलेजमधील युवक-युवतींनी भारताचे भविष्य घडविण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि ध्येयवादी दृष्टिकोन ठेवून ध्येयाकडे वाटचाल करावी. समाज काय म्हणेल याची पर्वा न करता स्वतःच्या मनाचा विचार करून जीवनात यश मिळवावे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री व वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. शिल्पा अविनाश झाट्ये यांनी केले.
डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा तसेच वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक 24 ऑगस्ट २०२६ रोजी ‘द गारलँड ऑफ वर्डस्’ या काव्यसंग्रहावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. शिल्पा झाट्ये बोलत होत्या.
डॉ. शिल्पा झाट्ये यांच्या लेखणीतून साकारलेल्या या काव्यसंग्रहाचा नुकताच प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. रेवतळे, मालवण येथील झाट्ये हॉस्पिटल व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. परिसंवादादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. अडचणींवर मात करून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाला श्री. रघुनाथ राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी ‘द गारलँड ऑफ वर्डस्’ या काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद करण्याचे मोलाचे कार्य केले आहे. पर्यटन सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या राणे सरांनी मालवण हायस्कूलमध्ये तब्बल ३३ वर्षे सेवा बजावली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी, “मोबाईल सर्वस्व देऊ शकत नाही. त्यामुळे वाचनाची सवय वाढवा आणि आपल्या ज्ञानाची समृद्धी करा,” असा मौलिक संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान प्रा. कांचन खानोलकर यांनी काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे प्रभावी व भावपूर्ण वाचन केले. तसेच संचिता करावडे, कार्तिक गोसावी, सलोनी पवार आणि प्राची परब या विद्यार्थ्यांनी काव्यसंग्रहाच्या अनुषंगाने उपस्थितांशी संवाद साधत आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिराशी यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन, साहित्याची आवड आणि सकारात्मक विचारांची रुजवण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती कुंभार यांनी केले.