प्रलंबित विकासकामे, निकृष्ट दर्जा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनातील अनागोंदीविरोधात आक्रमक भूमिका
मालवण ,दि.१२ ऑगस्ट
मालवण शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्या,
विकासकामांचा दर्जा, अनधिकृत बांधकामे आणि कचरा व्यवस्थापनातील अनागोंदी कारभाराविरोधात ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नगरपरिषदेच्या समोरील जागेत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नगरसेवक मयेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पर्यटन राजधानी असलेल्या मालवण शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या मंजूर नळपाणी योजनेचे काम निविदेतील अटी व शर्तीनुसार होत नाही. या योजनेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेचे सर्व्हेसर्वा हे ठेकेदाराचे जवळचे नातेवाईक असल्याने योजनेवर योग्य नियंत्रण ठेवले जात नाही व कामाचा दर्जा तपासला जात नाही. यासंदर्भात ठाकरे शिवसेना व इतर नगरसेवकांनी आढावा बैठक घेण्याबाबत पत्र दिले होते, परंतु प्रशासनाने कोणतीही चौकशी किंवा कारवाई केलेली नाही.
शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेली भुयारी गटार योजना गेली २० वर्षे अपूर्णच आहे. ही योजना अपूर्ण का राहिली? कामाची मुदत किती होती? या योजनेसाठी शासनाकडून किती निधी प्राप्त झाला व किती खर्च झाला? याची कोणतीही माहिती स्पष्ट नाही. ठेकेदारावर वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने ठेकेदाराला सोबत घेऊन प्रशासनाने आढावा बैठक घ्यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मालवणच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या देऊळवाडा ते भरड या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर भगत यांच्या अनधिकृत बांधकामामुळे व दुकानांमुळे सतत वाहतूक कोंडी होते. याबाबत नगरसेवकांनी आवाज उठवला असता अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभेत यावर आवाज उठवला असता, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने समन्वय साधून कारवाई करू, असे उत्तर दिले गेले; मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शहरातील घरोघरी कचरा उचलण्यासाठी पूर्वी काही लाखांत होणारा ठेका यावेळी २ कोटी रुपयांचा काढण्यात आला आहे. तरीही गेल्या १० वर्षांप्रमाणेच कचरा संकलन सुरू आहे. कंत्राटदार निविदेतील अटी व शर्तीनुसार काम करत नसून, शहरात कचरा गोळा करणे व डम्पिंग ग्राऊंडपर्यंत नेण्याबाबत कसलीही जनजागृती केलेली नाही. यामुळे नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही योग्य काम न करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाने खर्च करूनही योग्य काम न करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.
शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि ठेकेदारांना मिळणारे पाठीराखेपण याविरोधात प्रशासनाला जागे करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेसमोर उपोषण करणार आहे असे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी स्पष्ट केले.