मसुरे,दि.२८ ऑगस्ट (झुंजार पेडणेकर)
कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था (कोकण प्रांत) आयोजित ‘रानभाजी-स्थानिक भाजी उत्सव: थाळी आणि अल्पोपहार’ हा कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात ओक्स अकॅडमी, चिपळूण येथे नुकताच संपन्न झाला.
प्रारंभी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीनल ओक यांनी संस्थेच्या कार्याची व यशोगाथांची माहिती दिली. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत कृषी पर्यटन व फळप्रक्रिया क्षेत्रातील ही पहिलीच संस्था असून तरुणांचे स्थलांतर थांबवणे हा यामागचा उद्देश आहे. मान्यवरांचे स्वागत श्री. रामशेठ रेडीज यांनी ‘चिपळूण संगमेश्वर पर्यटन’ पुस्तक देऊन केले.
श्री. शशिकांत मोदी (नगरसेवक) म्हणाले, पुढील वर्षी महिला बालकल्याण विभाग, नगर परिषद व संस्था मिळून समस्त चिपळूणकरांसाठी हा कार्यक्रम आयोजित करू, असे नगराध्यक्षांच्या संमतीने जाहीर केले. तसेच सिंधूरत्न योजनेतून चिपळूण पर्यटनाचा प्रोजेक्ट करण्याचे नमूद केले.
श्री. अभय अंतरकर (कोंकण प्रॉडक्ट उद्योजक) यानी वयाच्या ७१ व्या वर्षी आपल्या उद्योगाची माहिती देताना अळूवडीसाठी अळूची पाने पालघरहून आणावी लागतात ही खंत व्यक्त करत तरुणांना या क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.
श्री. शत्रुघ्न म्हेत्रे (तालुका कृषी अधिकारी) यानी प्रधानमंत्री योजना व महिलांसाठी ७५% सबसिडीची माहिती देत फणस, शेवगा, अळू व स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभाग सदैव मार्गदर्शनास तयार असल्याचे सांगितले.
सौ. अंजली कदम (नगरसेविका) यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या.
मा. नगराध्यक्ष श्री. उमेशजी सकपाळ यांच्या हस्ते भाज्या लागवड व विक्री करणाऱ्या महिलांचा—सौ. नंदा बुरटे (कळवंडे), सौ. रिया शिंदे (आंबडस), सौ. मनीषा कांबळी (पाचाड) व सौ. गायत्री हुमणे—प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षांनी आयोजकांचे कौतुक करत पुढील वर्षी असा मोठा कार्यक्रम घेण्याचे आणि शेतकऱ्यांसाठी लवकरच मार्गदर्शक सत्र आयोजित करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना सुचवले.
या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक श्री. रामशेठ रेडीज, विश्वास पाटील, सदस्य संजय नाईक, पर्यटन तज्ञ समीर कोवळे, कैसर देसाई, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, उद्योजक उदय लोध, नंदू साडविलकर, श्री. वैभव संसारे, श्री. राजेश पाथरे, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, सौ. राधिका पाथरे, सी. ए. विवेक रेळेकर, उदयशेठ गांधी, सौ. कल्पना प्रभुदेसाई, सौ. विभा जाधव, सौ. स्वाती देवळेकर, प्रा. मयुरी काटकर, विशाखा चितळे आणि पत्रकार शुभदा जोशी उपस्थित होत्या.
उपस्थित लोकांनी माईन मुळा लोणचे, ओली हळद लोणचे, रान आवळा मध लोणचे, कासाळू चिवडा, कर्टुली-कारले मिक्स चिप्स, चिबुड रायतं, अळकुड्या सुकी भाजी, कंद रस्सा, भारंगी भाजी, कर्टुली भाजी, पातळ अळू भाजी, कवळा-कुरडू-भोपळा पाने वड्या, भाकरी, मिक्स रानभाजी राईस, मोदक आणि टाकळा समोसा अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.
संस्थेचे सचिव श्री. अमोल लोध यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.