आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी बदलला पक्ष; शिंदे गटाची ताकद पुन्हा वाढली
मुंबई,दि.३० जून
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील विधान परिषद आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, प्रवेशानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षांतरानंतर आमदारही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या अहिर यांच्या पक्षांतरामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
सचिन अहिर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्री, मुंबई अध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्या असून, आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते पक्षांतर करतील का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.