२१ जून रोजी जामसंडे येथे आयोजन; रक्तदानासह मत्स्यविभागाच्या विविध योजनांची माहिती, निःशुल्क नोंदणी व विमा संरक्षणाचा लाभ
देवगड, दि. १९ जून
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड मंडलाच्या वतीने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात परिसरातील नागरिक, युवक व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा देवगड मंडलाचे अध्यक्ष राजा भुजबळ यांनी केले आहे.
रक्तदान शिबिरासोबतच मच्छीमार बांधव व मासेमारी व्यवसायाशी संबंधित महिला-पुरुषांसाठी विविध शासकीय योजनांबाबत विशेष माहिती व मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मच्छीमारांसाठी ५ लाख रुपयांचे निःशुल्क विमा संरक्षण, NFDP (नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट पोर्टल) वर मोफत नोंदणी, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, सिंधुरत्न योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, किसान क्रेडिट कार्ड सुविधा तसेच मत्स्य व्यवसायासाठी वीजदर सवलत, नौका नोंदणी, परवाना प्रक्रिया आणि इतर कायदेशीर बाबींविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
मच्छीमार बांधव, भगिनी तसेच मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, देवगड मंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक तसेच वारसदाराची माहिती व संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असेही आयोजकांनी कळविले आहे.