सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
देवगड,दि.०२ सप्टेंबर
शिरगाव-साटमवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली येथून शिताफीने ताब्यात घेतले. तन्मय राजेंद्र साटम (वय २९, मूळ रा. शेवरे, शिरगाव, ता. देवगड, सध्या रा. दोन टाकी, धर्मा चाळ, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिरगाव-साटमवाडी येथे १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जयश्री सदाशिव बावसकर यांच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. पोलिसांनी मानवी कौशल्यासह सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढत त्याची ओळख पटवली. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथील गणेशनगर परिसरात सापळा रचून तन्मय साटम याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, तन्मय साटम याच्याविरुद्ध ठाणे पोलीस आयुक्तालयातील शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हाही दाखल असून, त्या प्रकरणात तो पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला २ सप्टेंबर रोजी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, एएसआय राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.