Phondaghat: चक्रीवादळाचा तडाखा; वडाचे महाकाय झाड कोसळून लाखोंचे नुकसान

शेअर करा

धुवांधार पावसासह विजांचा कडकडाट; दवाखाना, औषध दुकान व गुरुकृपा हॉटेलचे मोठे नुकसान, आठ-दहा दुचाकी थोडक्यात बचावल्या

फोंडाघाट,दि.०६ ऑक्टोंबर(संजय सावंत)
सलग आज दुसऱ्याही दिवशीही सायंकाळी च्या दरम्यान फोंडाघाट विभागामध्ये झालेल्या विजाच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या धुवांधार पावसामुळे आणि झालेल्या चक्रीवादळामुळे फोंडाघाट विभागात महावितरण आणि येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


🔴 दरम्यान यावेळी फोंडाघाट लोरे फाट्यावर असणाऱ्या हवेलीनगर येथील प्रथमेश कल्याणकर यांच्या गाळ्या लगत असलेल्या रस्त्याच्या कडेच वडाचे भले मोठे झाड चक्रीवादळा च्या तडाख्याने कोसळल्याने गाळ्यातील दवाखाना, औषध दुकानावर व गुरुकृपा हॉटेल चे लाखोंचे नुकसान झाले.यावेळी झाडाखाली उभे असलेल्या सुमारे आठ ते दहा दुचाकी शेजारी लोकांनी तत्परता दाखवत बाजूला केल्याने नुकसानी प्रमाण कमी करण्यात यश मिळाले.


दरम्यान यावेळी कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांनी निखिल कन्स्ट्रक्शन चे प्रसाद शेळके यांचे शी संपर्क साधून झाड हटविण्यासाठी माणसांची व जेसीबी सोय केली.घटनेचे गांभीर्य राखून तलाठी समृद्धी गवस, सहाय्यक शितल पारकर, आणि कोतवाल पांडुरंगराणे यांनी तातडीने येऊन घटनेची पाहणी केली. प्रथमदर्शनी कल्याणकर यांनी सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले. फोंडाघाट ग्राम विकास अधिकारी मंगेश राणे यांनीही त्यांच्याशी संपर्क साधून सहकार्य केले.


🔴तसेच काल झालेल्या वादळात काही ठिकाणी तुटलेल्या विजेच्या ताराची दुरुस्ती महावितरण कर्मचाऱ्यांकडून सुरु असतानाच आज दुपारी झालेल्या जोरदार चक्रीवादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याबरोबर फोंडाघाट-हुंमरट परिसरात 33 केव्ही वीजवाहिनीचे स्ट्रक्चर कोसळल्याने महावितरणचेही मोठे नुकसान झाले. यांचबरोबर कणकवली फिडर वरून होणारा वीजपुरवठा बंद झाला आहे.वैभववाडी फिडर वरून फोंडाघाट सबस्टेशन ला होणारा विजपुरवठा वाहिनी आधीच बंद अवस्थेत असल्याने फोंडाघाट परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.


त्यामुळे फोंडाघाटवासीयांना आजची रात्र अंधारात काढावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, आज श्री देव राधाकृष्ण मंदिरातील सप्ताहाची शेवटची रात्र असून, मारुतीवाडी येथील श्री मारुती मंदिरातही सप्ताहाची सांगता होत असताना. आज रात्री होणाऱ्या दोन्ही मंदिरांमधील डबलबारी भजन कार्यक्रम व रात्री ११ वाजता बालगोपाल मित्र मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या रंगीत-संगीत दिंडी कार्यक्रम याकरिता येणाऱ्या भाविकांच्या उत्साहावर विरंजन पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यामुळे फोंडाघाट मधील या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शेअर करा