Phondaghat News:”तर शिक्षणाधिकारी कार्यालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल”-….

शेअर करा

फोंडाघाट एज्युकेशन सोसा. संस्थाचालकानी दिला इशारा

फोंडाघाट,दि.१२ ऑक्टोबर(संजय सावंत)
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्था व शाळा याविषयी महासंघाच्या मदतीने खोटी माहिती प्रसारित करून वारंवार तक्रारी करून शाळेची बदनामी करण्याचा व शिक्षणाधिकारी कार्यालय यांना हाताशी धरून संस्थाचालकांवर दबाव आणण्याचा येथील सेवा समाप्ती झालेले शिक्षक अजित कुमार देठे यांचा प्रयत्न सुरू असून शिक्षणाधिकारी कार्यालयाला सारख्या जबाबदार विभागाकडून अशी दिशाभूल करण्यात येणारी बेकायदेशीर पत्र संस्थेला पाठवून संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल तर शिक्षणाधिकारी कार्यालय यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्था चालकांकडून देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी एका स्थानिक वृत्तवाहिनी मध्ये प्रसारित झालेल्या वृत्तानुसार,
शिक्षण विभागाने यापूर्वी संबंधित संस्थेला या प्रकरणाबाबत सूचना दिल्या असून, संस्थेने विभागाच्या निर्णयाला सक्षम प्राधिकरणासमोर आव्हान दिले नसल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यामुळेफोंडाघाट हायस्कूल चे शिक्षक अजितकुमार देठे यांना तातडीने सेवेत रुजू करून घेऊन त्यांचे वेतन पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी याबाबत महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान याबाबत संस्थेची भूमिका सर्वांना कळावी व या बातमी बाबत खुलासा करण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्थाचालकांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संस्था सेक्रेटरी शेखरलिंग्रस बोलत होते सोबत संस्थेचे चेअरमन महेश उर्फ राजू पटेल,खजिनदार विठोबा तायशेटे, सदस्य रंजन नेरूरकर, संजय आंग्रे, आनंद मर्ये, संदेश पटेल, राजन नानचे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्था सेक्रेटरी शेखर लिंग्रस म्हणाले,फोंडाघाट हायस्कूलमध्ये पिटी शिक्षक म्हणून त्यावेळी कार्यरत असणारे अजित कुमार देठे यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी संस्था व शाळेविषयी खोटी माहिती प्रसारित करून शाळेची बदनामी करत संस्थाचालकांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सातत्याने केले . या त्यांच्या गैरवर्तनांमुळे नियमानुसार संस्थेने एक संस्था प्रतिनिधी, एक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, व अजितकुमार देठे यांच्या वतीने एक प्रतिनिधी अशा त्रिसदस्य समितीची स्थापना करून चौकशी केली. दरम्यान या त्रीसदस्य समितीकडून आलेल्या चौकशी अहवाल निर्णयानुसार शिक्षक अजित कुमार देठे हे दोषी आढळल्याने त्रिसदस्य समितीच्या स्वाक्षरीने श्री अजित कुमार देठे यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत अजित कुमार देठे यांनी मे. शाळा न्यायाधिकरण कोर्ट, कोल्हापूर याठिकाणी या सेवा समाप्ती निर्णयाविरुद्ध वकिलांमार्फत अपील केले होते. मात्र स्वतःच केलेले अपील अजित कुमार देठे यांनी बिनशर्त मागे घेतले. मग जर त्यांच्या म्हणण्यानुसार संस्था चालक त्यांच्यावरती अन्याय करत असेल तर त्यांनी केलेल्या अपील त्यांनी मागे का घेतले? असा सवाल संस्थाचालकांकडून यावेळी करण्यात आला. अजित कुमार देठे यांनी कोर्टामध्ये केलेले अपील स्वतःच बिनशर्त मागे घेतल्याने त्रिसदस्य समितीने दिलेला सेवा समितीचा निर्णय कायम राहिला असून त्यामुळे आता संस्थेला त्यांना सेवेत परत घेणे शक्य नाही असे यावेळी सांगण्यात आले.
तरी अजित कुमार देठे यांचा माननीय शिक्षणाधिकारी कार्यालय यांना हाताशी धरून संस्थेला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत असून त्यांची केलेली सेवा समाप्ती ऐवजी निलंबन केले असे भासवून शिक्षणाधिकार्यालयाला हाताशी धरून” अजित कुमार देठे यांना हजर करून घ्या” असे हास्यास्पद पत्र संस्थेला पाठवण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयासारख्या जबाबदार कार्यालयाने अशी दिशाभूल करण्यात येणारे बेकायदेशीर पत्र पाठवून संस्थाचालकांवर दबाव आणणे ही बाब गंभीर असून असे प्रकार झाल्यास संस्थेकडून शिक्षणाधिकारी कार्यालयावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

शेअर करा