प्रा.रणधीर शिंदे, ॲड.देवदत्त परूळेकर, प्राचार्य गोविंद काजरेकर, प्रा.शरयू आसोलकर, प्रा.संजीवनी पाटील यांचा सहभाग
सावंतवाडी,दि. १८ ऑगस्ट
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “मुक्त संवाद” या उपक्रमांतर्गत कवी विठ्ठल कदम यांच्या ‘फाळ’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि परिसंवाद शनिवार 22 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 4 वा. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कवितासंग्रहाचे प्रकाशन ग्लोबल बुक हाऊस, पनवेल या संस्थेने केले आहे.
नामवंत ज्येष्ठ लेखक तथा संत साहित्याचे अभ्यासक अॅड.देवदत्त परूळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व समीक्षक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभाग प्रमुख प्रा. रणधीर शिंदे उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती कवयित्री उषा परब, संध्या तांबे आणि श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर व ज्येष्ठ कवी मधुकर मातोंडकर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमातील परिसंवादाला प्रमुख वक्ते म्हणून समीक्षक तथा कवी डॉ. गोविंद काजरेकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. शरयू आसोलकर आणि समीक्षक प्रा. संजीवनी पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यात राजेश कदम, स्नेहा कदम आणि तन्वी परब हे ‘फाळ’ मधील निवडक कवितांचे वाचन करणार आहेत.
‘फाळ’ या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांची अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. तसेच ज्येष्ठ कवी दासू वैद्य आणि प्रकाश होळकर यांनी या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. विठ्ठल कदम हे विद्रोही परंपरेतील कवी म्हणून ओळखले जातात. मात्र ‘फाळ’ या संग्रहात त्यांनी शेती, शेतकरी आणि त्याचे समकालीन वास्तव अत्यंत कठोर शब्दांत मांडले आहे. शेतीचे व्यावसायिकीकरण न झाल्यामुळे शेतकऱ्याची झालेली फरपट, शासन व्यवस्थेचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष आणि या सर्वांतून शेतकऱ्याला आलेली निराशा याला कदम यांनी कवितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. कर्जबाजारीपणा, नैसर्गिक संकटे, बाजारातील अस्थिरता आणि आत्महत्यांचे सत्र यामुळे उध्वस्त झालेल्या ग्रामीण जीवनाचे चित्रण ‘फाळ’ मधील कवितांमधून ठळकपणे दिसून येते. मातीशी असलेले नाते, शेतात राबणाऱ्या हातांची कथा आणि तरीही जगण्याची जिद्द न सोडणाऱ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान या सर्व भावना कदम यांनी सोप्या पण भेदक भाषेत मांडल्या आहेत.
तरी या कार्यक्रमाला सर्व रसिक, वाचक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रमेश बोंद्रे, ॲड. संदीप निंबाळकर आणि प्रा. अरुण पणदूरकर यांनी केले आहे.