सावंतवाडी : मुलांच्या भवितव्यासाठी वयाच्या १६ वर्षांपर्यंत मोबाईल टाळा

शेअर करा

“मोबाईल हा मुलांच्या हातातील राक्षस”; ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचे परखड आवाहन

शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक गुरुदास मटकर यांचा वह्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना केले आवाहन

सावंतवाडी,दि. १८ ऑगस्ट

आजच्या डिजिटल युगात मोबाईल हे संपर्काचे प्रभावी साधन असले तरी लहान मुलांच्या हातात आलेला मोबाईल त्यांच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरू शकतो. “मोबाईल हा मुलांच्या हातात मिळालेला राक्षस आहे. या राक्षसाच्या आहारी गेल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुलांनी शक्यतो वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मोबाईलचा वापर टाळावा,” असे परखड आवाहन सकल मराठा समाज व सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक गुरुदास मठकर यांनी येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ मध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात गावडे बोलत होते.
यावेळी गावडे यांनी मोबाईलच्या अतिवापराबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना अत्यंत परखड शब्दांत इशारा दिला. “एक-दोन वर्षांच्या मुलांच्या हातातही मोबाईल देण्याची सवय आज अनेक पालकांमध्ये दिसत आहे. ही सवय अत्यंत घातक आहे. सुरुवातीला मुलाला शांत करण्यासाठी दिलेला मोबाईल पुढे त्याच्या सवयीचा आणि व्यसनाचा भाग बनतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.मोबाईलवरील रील्स, गेम्स आणि सोशल मीडिया यांच्या अतिवापरामुळे मुलांचा अभ्यास, एकाग्रता आणि प्रत्यक्ष सामाजिक संवाद यावर परिणाम होऊ शकतो. काही मुले मोबाईलच्या इतक्या आहारी जातात की आई-वडिलांशी संवाद साधण्यापेक्षा मोबाईलच्या आभासी जगात रमणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटू लागते. ही परिस्थिती पालकांनी वेळीच ओळखण्याची गरज असल्याचे गावडे यांनी सांगितले.
“मुलांच्या हातात मोबाईल देणे म्हणजे त्यांना डिजिटल जगाचे दार उघडून देणे आहे; पण त्या दारातून काय आत येत आहे, यावर पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. संपर्कासाठी मोबाईल आवश्यक असेल तर सोशल मीडिया, रील्स आणि अनावश्यक अॅप्स नसलेला साधा मोबाईल वापरता येईल. मात्र मुलांचे बालपण आणि शिक्षण मोबाईलच्या पडद्यामागे हरवू देऊ नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
पालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे गावडे यांनी सांगितले. “मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका आणि त्यांच्यासमोर सतत मोबाईलवर रील्स पाहत बसू नका. पालक जे करतात तेच मुले अनुकरण करतात. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल तर सुरुवात घरातील मोठ्यांनीच केली पाहिजे,” असे ते म्हणाले.
गुरुदास मठकर यांच्या उपक्रमाचे कौतुक
यावेळी गावडे यांनी माजी नगरसेवक गुरुदास मटकर यांच्या पुढाकारातून आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचेही कौतुक केले. “संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. यापूर्वी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी शंभर सायकलींचे वाटप केले होते. समाजासाठी काहीतरी देण्याची दानशूर वृत्ती त्यांच्यात पहिल्यापासून आहे. अशी माणसे समाजात कमी असतात,” असे गावडे यांनी नमूद केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, नगरसेविका सीमा नाईक, सुनील नाईक, नीता विर्नोडकर आदी उपस्थित होते.
मोबाईल द्यायचा की भविष्य घडवायचे? निर्णय पालकांनी घ्यायचा!
आज मुलांना मोबाईलपासून पूर्णपणे दूर ठेवणे प्रत्येक कुटुंबाला शक्य होईलच असे नाही. मात्र मोबाईलचा वापर किती, कशासाठी आणि कोणत्या वयात करायचा, याचे भान पालकांनी ठेवणे ही काळाची गरज आहे. मुलांच्या हातात मोबाईल देऊन पालकांनी आपली जबाबदारी संपली असे समजू नये. कारण आज हातात दिलेला मोबाईल उद्याचे भवितव्य घडवूही शकतो आणि चुकीच्या वापरामुळे ते उद्ध्वस्तही करू शकतो.
मुलांना मोबाईल नव्हे, पुस्तक द्या; रील्स नव्हे, संस्कार द्या; आभासी जग नव्हे, वास्तवातील स्वप्ने दाखवा—तरच भावी पिढी खऱ्या अर्थाने घडेल! असे आवाहन सीताराम गावडे यांनी केले

शेअर करा