​सावंतवाडी : न्यायालयाच्या निर्णयामुळे मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचा मार्ग मोकळा

शेअर करा

सावंतवाडीत २०० खाटांचे रुग्णालय होणार उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जागेचा वाद मिटला
आमदार दीपक केसरकर

​सावंतवाडी,दि.२० ऑगस्ट
गेल्या आठ वर्षांपासून जागेच्या वादामुळे रखडलेल्या सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात राजघराण्यातील दोन्ही बाजूंच्या तडजोडीनंतर न्यायालयाने यावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामुळे सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात आता आधुनिक २०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय साकारले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
​न्यायालयाचा निर्णय आणि तडजोड:
लोकांचे हित लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने तातडीने ५१ गुंठे जागा राजघराण्याकडे हस्तांतरित करण्याचे आणि उर्वरित जागेवर शासनाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले आहेत. राजघराण्याच्या दोन्ही बाजूंकडून मांडण्यात आलेली स्वतंत्र प्रतिज्ञापत्रे न्यायालयाने मान्य केली.
​सहकार्य व आभार: आमदार दीपक केसरकर यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्र शासनाचे मुख्य वकील ॲड. शिरीष हिरे यांचे विशेष आभार मानले. तसेच सावंतवाडीचे राजेसाहेब खेमसावंत, युवराज लखमराजे भोसले, श्री. व सौ. भोगले घराणे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सहकार्याबद्दल धन्यवाद मानले.
​प्रकल्पाचा खर्च आणि स्वरूप:
​बजेटमध्ये वाढ: २०१८ मध्ये या रुग्णालयाला मंजुरी मिळाली होती आणि २०१९ मध्ये भूमीपूजन झाले होते. त्यावेळी ३८ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर झाले होते. मात्र, जागेच्या वादामुळे काम सुरू होऊ शकले नाही. आता नव्याने टेंडर मागवले जाणार असून या प्रकल्पाचा खर्च सुमारे ८० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
​ या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात हृदयविकार, कॅन्सर, युरॉलॉजी आणि ब्रेन (न्यूरो) संदर्भातील गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध होतील.
​ सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या १०० खाटा आहेत आणि नव्याने तयार होणाऱ्या १०० खाटा मिळून हे एक सुसज्ज २०० खाटांचे रुग्णालय बनेल.
​स्थानिक रुग्णांना मोठा दिलासा:
सावंतवाडीत आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त रुग्णालय नसल्यामुळे दरवर्षी सुमारे १० हजार रुग्णांना उपचारासाठी गोवा बांबोळी येथे जावे लागत होते. प्रवासातील अडचणींमुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. न्यायालयाने या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय दिला.
येत्या २ ते ३ महिन्यांत रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे प्रयत्न केले जातील. सध्याच्या खालच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून नव्याने कॉलम उभारून अतिरिक्त खाटांची क्षमता वाढवता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. मात्र अस्तित्वात असलेल्या रूग्णालयात वाढीव काम करता येणार नाही तर छप्पर उभे राहू शकते. त्यामुळे चाचपणी करून पुढील निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.हे हॉस्पिटल पूर्ण झाल्यानंतर परिसरातील हजारो रुग्णांची उपचारासाठी होणारी पायपीट कायमची थांबणार आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना फायदा होईल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

शेअर करा