डॉक्टर निवृत्त होत असल्याचे कारण देत दवाखाना बंद करण्याचा निर्णय; आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा फटका बसण्याची शक्यता
सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट
सावंतवाडी शहरातील गेली १०० वर्षे कार्यरत असलेला महावीर दवाखाना डॉक्टर निवृत्त होत असल्याचे कारण देऊन बंद करण्याचा नगरपरिषदेचा निर्णय अतिशय दुर्दैवी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी धक्कादायक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प शिलकीचा आहे. त्यामुळे नगरपरिषदेने या दवाखान्यासाठी नवीन एमबीबीएस डॉक्टरची नेमणूक करून गरीब व गरजू रुग्णांना मोफत जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे गरजेचे असून, ते आर्थिकदृष्ट्या सहज शक्य आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे औषधांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत मोफत जेनेरिक औषधे दिल्यास शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे डॉ. परुळेकर यांनी म्हटले.
महाराष्ट्रात अनेक नगरपालिका व नगरपरिषदांची स्वतःची छोटी रुग्णालये कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर सावंतवाडी नगरपरिषदेने १० खाटांचे रुग्णालय सुरू केल्यास सर्वसामान्यांकडून त्याचे स्वागतच होईल. प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु दैनंदिन आजारांवरील उपचारांसाठी नगरपरिषदेचे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.