सावंतवाडी,दि.२१ ऑगस्ट
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जागेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्वतंत्र संमती पत्रानंतर (प्रतिज्ञापत्र) या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, राजघराण्याच्या वतीने जनहित आणि सामाजिक भावनेतून ७० गुंठे खुली जागा विनामोबदला शासनाला देण्यात आली आहे. यामुळे इमारतीखालील २० गुंठे आणि खुली ७० गुंठे अशी एकूण ९० गुंठे जागा आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी उपलब्ध झाली आहे. तर उर्वरित ५० गुंठे जमिनीवर राजघराण्याचा हक्क निश्चित झाला आहे.
राजवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले, युवराज लखमराजे भोंसले आणि कायदेशीर सल्लागार ॲड. शामराव सावंत यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी सांगितले की, या जागेबाबत १९८६ पासून न्यायालयीन खटला सुरू होता. जिल्हा न्यायालयाने इमारत शासनाची आणि जमीन राजघराण्याची असा निर्णय दिला होता, ज्याविरोधात शासनाने २०१० मध्ये उच्च न्यायालयात अपील केले होते. आता हा वाद सुटला असून, शासनाने या जागेचा वापर केवळ इमारत उभी करण्यासाठी न करता गोरगरीब जनतेला तज्ज्ञ डॉक्टर आणि योग्य आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी करावा. या विषयात राजकारण न करता जनहिताला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
युवराज लखमराजे भोंसले यांनी स्पष्ट केले की, नगरपरिषद निवडणुकीत जनतेला दिलेले वचन राजघराण्याने पूर्ण केले आहे. सुमारे १५ कोटी रुपये मूल्याची ही जागा कोणत्याही मोबदल्याशिवाय लोकहितासाठी देण्यात आली आहे. मोती तलावाच्या मालकी हक्काबाबतचा प्रश्न भविष्यात निकाली निघाल्यास तो तलावही जनतेसाठी समर्पित केला जाईल, असा शब्द त्यांनी दिला. मात्र इतर जमिनी बाबत निर्णय घेतला पाहिजे तसेच रुग्णालयाच्या नामकरणाबाबत जनतेनेच निर्णय घ्यावा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.
राजघराण्याने नेहमीच श्रेयापेक्षा जनकल्याणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या रुग्णालयातून सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जनतेनेही सतत पाठपुरावा करावा, असे आवाहन राजघराण्याच्या वतीने श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी केले आहे.
मल्टीस्पेशालिटी उभारल्यानंतर त्याला राजघराण्याच्या पूर्वजांचे नाव देण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता युवराज म्हणाले, आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता ही जमीन दिली आहे. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयास काय नाव द्यावे हे जनतेच्या तोंडून येऊदेत. कारण, यापूर्वी सुद्धा राजघराण्याने आरोग्य, शिक्षण याबाबतीत योगदान दिलेले आहे. जनतेला ते ठाऊक आहे. तर आम. दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानेच हा प्रश्न मार्गी लागला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. लवकरच तिथे रूग्णालय उभं राहणार असून मुख्यमंत्री अन् शासनाकडून त्याला पूर्ण सहकार्य राहणार आहे. यासाठी आमचाही पाठपुरावा सुरू असून आरोग्य मंत्र्यांसह चर्चा झाली आहे. केंद्रापासून शहरापर्यंत आमचं सरकार आहे. त्यामुळे निश्चितच आरोग्य समस्येचा प्रश्न मार्गी लागेल असंही युवराज लखमराजे भोंसले म्हणाले.
तर मल्टीस्पेशालिटीच्या जागेसंदर्भात राजघराण्याने हरकत घेतली नव्हती. तर शासनाकडून उच्च न्यायालयात हरकत घेतली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रीया सुरू असताना शासनाकडून मल्टीस्पेशालिटीचे भूमीपूजन करणं हे मुळात योग्य नव्हतं. यानंतर दोन वेळा राजघराण्याकडूनही शासनासह तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सामंजस्य करार झाले होते.आमदार दीपक केसरकर यांनी देखील यासाठी बरेच प्रयत्न केले. न्यायालयात दाखल केलेल्या स्वतंत्र संमती पत्रानंतर अखेर हा तिढा सुटल्याची माहिती राजघराण्याचे कायदेशीर सल्लागार ॲड. शामराव सावंत यांनी दिली.