संजू परब यांना वाढदिवसाच्या दिल्या भावनिक शुभेच्छा
माझ्या संघर्षाच्या काळात संजू माझ्यासोबत सावलीसारखा राहिला
सावंतवाडी,दि. १९ ऑगस्ट
गेली अनेक वर्षे संजू परबचा एकही वाढदिवस मी चुकवला नाही. तो माझ्या घरचा सदस्य आहे, माझ्या भावासारखा आहे. माझ्या राजकीय संघर्षात ज्या काही व्यक्ती माझ्या सोबत कायम राहिल्या, त्यात अग्रक्रमाने घेतलं जाईल असं नाव म्हणजे संजू परब. राजकारणी माणसाकडे डोकं असतंच, मात्र मन असलेला माणूस म्हणजे संजू. माझ्या त्या १० वर्षांच्या काळात मला पुन्हा पुन्हा जिल्ह्यात आणणारा हा माझा मित्र आहे,” अशा अत्यंत भावनिक शब्दांत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

भाषणात पुढे बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, “मी आजवर त्याला काहीच देऊ शकलो नाही आणि पुढे देईन की नाही हे मला माहीत नाही. पण माझ्यावर तसंच दीपक केसरकर यांच्यावर झालेल्या टीकेनंतर पहिलं उत्तर देणारा संजूच होता. त्याला मी आज एकच सांगतो की, सगळ्याच गोष्टी बोलू नकोस, काही तरी मनात ठेवत जा.”

आपल्या राजकीय प्रवासातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचा उल्लेख करत निलेश राणे म्हणाले, “माझे प्रतिस्पर्धी हे शिंदे शिवसेनेतून लढणार होते, हे सगळं ठरलं होतं. राणेंना काय सांगायचं हेसुद्धा ठरलं होतं. मात्र त्यानंतर उदय सामंत यांनी मला एकनाथ शिंदे यांच्याकडे नेलं आणि माझं प्रेझेंटेशन त्यांनीच केलं. त्यामुळे माझ्या जीवनात उदय सामंत यांचं योगदान मला नाकारता येत नाही.”
स्थानिक राजकीय समीकरणांवर भाष्य करताना ते म्हणाले, “जोपर्यंत आमदार दीपक केसरकर ग्रीन सिग्नल देत नाहीत, तोपर्यंत गोष्टी अवघड असतात. त्यामुळे कोणतं पद कधी मिळावं हे देवच ठरवत असतो. संजू आणि मनीष ही आमच्या घरचीच मुलं आहेत. त्यामुळे ते दोघेही मोठे होवोत “, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
शेवटी संजू परब यांच्याशी असलेल्या घट्ट नात्याचा पुनरुच्चार करत निलेश राणे म्हणाले, “संजू नेहमीच एक मित्र आणि भाऊ म्हणून सावलीसारखा माझ्यासोबत उभा राहिला. संजू, तू खूप मोठा हो! माझा एक भाऊ खूप पुढे गेला तर मला त्याचा नक्कीच आनंद होईल.” निलेश राणे यांनी संजू परब यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत अशी प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेला, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती सुस्मिता जाधव, संजय पडते, शिवसेना महिला आघाडी प्रमुख ॲड. नीता कविटकर, तालुका प्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, अशोक दळवी, आनंद शिरवलकर, डुबळे, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडीस आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.