शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब त्यांनी नेत्यांसह उपस्थितांचेही मानले आभार
खासदार नारायण राणे यांच्या शब्दाबाहेर कधीही नाही
सावंतवाडी ,दि. १९ ऑगस्ट
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माझे श्रद्धास्थान व राजकीय गुरू आमदार निलेश राणे आणि मार्गदर्शक आमदार दीपक केसरकर यांसारख्या दिग्गज नेत्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त येऊन मला शुभेच्छा दिल्या हे माझ्यासाठी खूप मोठ आहे. खासदार नारायण राणे यांच्या शब्दाबाहेर मी कधीही नाही त्यांच्यासोबतच या सर्व नेत्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हीच माझ्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठी शिदोरी आहे,” अशा शब्दांत संजू परब यांनी आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
आमदार निलेश राणे हे माझ्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहिले असून, आजवर त्यांनी माझा एकही वाढदिवस चुकवलेला नाही, अशी कृतज्ञता संजू परब यांनी या वेळी व्यक्त केली. निलेश राणे आणि उपस्थित सर्वच मान्यवरांनी मला जनतेच्या सेवेसाठी कायम कार्यरत रहा असे मार्गदर्शन केले आहे, यांचा शब्द मी निश्चितच शिरसावंद्य मानून जनसेवेचे व्रत कायम राखीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमचे सर्वांचे नेते आणि माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या शब्दाबाहेर आम्ही कधीही जाणार नाही, आम्ही आज जे काही आहोत ते केवळ त्यांच्यामुळेच आहोत, असे सांगतानाच राजकारणात वरिष्ठांचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा असतो आणि माझ्यासोबत या सर्वांचे आशीर्वाद आहेत, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे असणे हा माझा प्लस पॉईंट आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी भाषणादरम्यान केली. मंत्री उदय सामंत यांनीही आपल्या भाषणात या गोष्टीला दुजोरा दिला असून, त्यामुळे मला काम करण्यासाठी आणखीन बळ मिळाले असल्याचे संजू परब म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी संजू परब यांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच विविध माध्यमातून शुभेच्छा देणाऱ्या सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनापासून आभार मानले.