सावंतवाडी दि.२२ ऑगस्ट
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ८० टक्के बेरोजगार स्थानिक युवकांचीच नोकरभरती करण्यात यावी, या विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या भूमिकेला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर आणि जोरदार पाठिंबा दर्शवला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणले जात असल्याने स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दहा हजार शिक्षक भरती तसेच जिल्हा संवर्ग भरती पूर्ववत करण्यासाठी आमदार प्रमोद जठार हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार आहेत. हे पाऊल यापूर्वीच उचलले जाणे आवश्यक होते, मात्र उशिरा का होईना जठार यांनी योग्य आणि स्पष्ट भूमिका घेतल्याचे साळगावकर यांनी स्पष्ट केले.
स्थलांतर रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय:
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे येथील तरुण पिढी नोकरीसाठी सातत्याने मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद आणि गोवा येथे स्थलांतर करत आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात घटत आहे. सह्याद्रीच्या कड्या-कपारीतील आणि ग्रामीण भागांतील गावांमधून तरुण वर्ग गायब झाला असून, ही गावे आता ‘वृद्धांची गावे’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत.
जिल्ह्याची लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आणि तरुणांना स्वजिल्ह्यातच रोजगार मिळवून देण्यासाठी ८० टक्के भरती ही सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील स्थानिक युवक-युवतींचीच व्हावी, ही मागणी अत्यंत रास्त असून अधिवेशनातील या विधेयकाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे बबन साळगावकर यांनी सांगितले.