सावंतवाडीत अवैध गोवा बनावटीच्या दारूसह एकावर कारवाई; २० हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

शेअर करा

सावंतवाडी,दि.२ ऑक्टोबर
सावंतवाडी बाहेरचा वाडा येथील एका उघड्या बेकरीत अवैधपणे गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका इसमावर सावंतवाडी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सावंतवाडी बाहेरचा वाडा येथील ‘नॅशनल’ उघड्या बेकरीच्या आवारात एक इसम बेकायदेशीरपणे दारू बाळगून असल्याची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत आरोपी मोहंमद शमीम छेदी (रा. बुराण गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याच्या ताब्यातून एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत ठेवलेल्या ‘गोल्डन’, ‘रॉयल स्टॅग’, ‘ओल्ड मंक’ आणि ‘डीएसपी ब्लॅक’ या कंपनीच्या गोवा बनावटीच्या कंपनी सीलबंद दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
​याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आरोपी मोहंमद शमीम छेदी याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५ (३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
​सदरची कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धुरी करत आहेत.

शेअर करा