**श्री देव वेतोबा मंदिरातील बैठकीत ११ गावांतील ग्रामस्थांना दिला शब्द – “मी पालकमंत्री असेपर्यंत कोणत्य
सावंतवाडी, दि. १९ जून
आजगाव दशक्रोशीत सध्या सुरू असलेल्या मायनिंग सर्वेक्षणावरून स्थानिक जनतेमध्ये तीव्र संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज श्री देव वेतोबा मंदिरात जाऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. “मी आज देवाच्या मंदिरात बसलो आहे. त्यामुळे केवळ तुम्हालाच नाही, तर या भागातील ११ गावांतील ग्रामस्थांना शब्द देतो की, मी पालकमंत्री असेपर्यंत या गावांमध्ये कोणत्याही परिस्थितीत मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही,” असे स्पष्ट आश्वासन मंत्री राणे यांनी बैठकीत दिले.
’ड्रोन सर्वेक्षणाशी प्रशासनाचा संबंध नाही’
गावात झालेल्या ड्रोन सर्वेक्षणाबाबत बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, जे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले, त्याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. एखादे सर्वेक्षण करायचे असल्यास त्याला सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नसते. कंपनीचे अधिकारी थेट गावात येऊन सर्वेक्षण करू शकतात आणि त्यानंतर ते आपला अहवाल सरकारला सादर करतात. जमिनीखाली मिनरल्स (खनिज) आढळल्यास ते सरकारकडे प्रकल्पासाठी विनंती करतात. त्यामुळे या सर्वेक्षणाशी आमचा किंवा प्रशासनाचा काडीमात्र संबंध नाही, असा खुलासा त्यांनी केला. “यापूर्वी मायनिंगमुळे आम्हाला भरपूर भोगावे लागले आहे, ती चूक आता पुन्हा करणार नाही. आम्ही नेहमीच लोकांसोबत राहू. तुम्ही कोणतीही चिंता करू नका आणि गावातील वातावरण खराब करू नका,” असे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामस्थांनी केला प्रश्नांचा भडीमार:
या बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांना विविध प्रश्नांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही मायनिंग होणार नाही असे सांगत असताना, तुमचे सहकारी कंपनीसोबत काय करत आहेत? जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी गावात का आले नाहीत? कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेता ड्रोन सर्वेक्षण झालेच कसे?” अशा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी केला. तसेच “तुम्ही आमच्या गावात आणि देवळात आला आहात, तर आता आम्हाला शब्द द्या,” अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.
ज्यावेळी सर्वेक्षण सुरू होते, तेव्हा मनिष दळवी तेथे काय करत होते? त्यांनी गावात येऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न कसा केला? असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला. त्यावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, मनिष दळवी हे राणेंचे कार्यकर्ते असून आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ते लोकांच्याच बाजूने बोलत होते, ते कंपनीसोबत नव्हते, असा खुलासा करत राणे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि “माझ्यावर विश्वास ठेवा,” असे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. या परिसरात पर्यटन पूरक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मी आणि आमदार दीपक केसरकर यासाठी प्रयत्न करत आहोत. ताज गृप पंचतारांकित हॉटेल प्रकल्प सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे असे त्यांनी सांगितले. गोवा राज्यात तरूणांना रोजगारा साठी जावे लागू नये म्हणून रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या पर्यटन प्रकल्पांना मान्यता दिली जाईल असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
यावेळी झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान ग्रामस्थांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाप्रमुख संजू परब, सभापती प्रितेश राऊळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, अँड. स्वप्निल प्रभूआजगावकर, सिद्धेश परब, अजित नातू, सचिन देसाई, रूपेश धर्णे, हेमंत मराठे, सचिन प्रभू आणि गावातील प्रमुख ग्रामस्थांचा समावेश होता.