तळेरे: कासर्डेच्या सावी मुद्राळेला राज्यस्तरीय अभिनय गुणवत्ता पुरस्कार

शेअर करा

लगोरी’ बालनाट्यातील दमदार भूमिकेसाठी महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात गौरव; कोकणच्या बालकलाकाराने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.

तळेरे,दि.०३ जुलै

कोकणातील उदयोन्मुख बालकलाकार आणि कासर्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची इ.७तील विद्यार्थिनी कु.सावी विधी वैभव मुद्राळे हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण समारंभात तिला “अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र” या पुरस्काराने गौरविण्यात आले. कु.सावी हिने कोल्हापूर केंद्रातून युथ फोरम देवगड व आज्ञा कोयंडे लिखित व दिग्दर्शित “लगोरी” या बालनट्यातील DJ ही भूमिका साकारली होती. तिच्या उल्लेखनीय अभिनयाची पोचपावती म्हणून तिला हा सन्मान मिळाला. हा सन्मान सोहळा नुकताच भरत नाट्यमंदिर सदाशिव पेठ पुणे येथे पार पडला.
हहकु.सावी मुद्राळे ही केवळ एक गुणवंत बालकलाकार नसून, मराठी, मालवणी भाषा आणि कोकणच्या लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने कार्य करणारी युवा सांस्कृतिक दूत म्हणूनही ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे ती कोकणातील लोकपरंपरा, सण-उत्सव, बोलीभाषा आणि संस्कृती लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ती ‘लगोरी’ ह्या नाटकाच्या सरावासाठी दररोज 100 किलोमीटर प्रवास करत होती. निश्चितच ही गोष्ट ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.
अभिनयासोबतच सावी मुद्राळेने अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून, तिच्या कार्यामुळे बालकांमध्ये मालवणी भाषा, नाट्यकला आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होत आहे. अत्यंत कमी वयात विभागीय पुरस्कार मिळवून तिने मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चौकट
यापुर्वीही झी मराठी वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनिअरमध्ये टॉप ४ पर्यंत मजल…

यापूर्वीही सावीने झी मराठीवरील ड्रामा ज्युनिअर ह्या कार्यक्रमात टॉप 4 पर्यंत मजल मारली होती तसेच वीर गाथा 5.0 या राष्ट्रीय उपक्रमात तिची “सुपर 100” मध्ये निवड झाली होती व दिल्लीला तिचा संरक्षण मंत्र्यांद्वारे सत्कार झाला होता.
तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार तसेच कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, विविध समित्यांचे सर्व पदाधिकारी, प्राचार्या बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. असून, भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही ती महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

शेअर करा