शेतकरी वीरेंद्र कांबळी यांच्या बागेतील सहा डझन आंब्यांची पेटी २९ ऑक्टोबरला रवाना; हापूसला बाजारात किती दर मिळणार, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष
देवगड,दि.२९ ऑक्टोंबर
देवगड तालुक्यातील वाडातर येथील शेतकरी वीरेंद्र दत्तात्रय कांबळी यांच्या बागेतील हापूस आंब्याची सहा डझनची पहिली पेटी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटमध्ये रवाना झाली. शहा अँड बाटे या फर्ममार्फत त्यांनी ही पेटी बाजारपेठेत पाठवली आहे.
कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाची चाहूल लागली असून, वाडातर येथील कांबळी यांच्या बागेतून आंब्याची पेटी वाशी बाजारपेठेत दाखल होण्याच्या दिशेने रवाना झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हापूस आंब्याला बाजारपेठेत कसा दर मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.