मुंबई-गोवा महामार्गावर पेट्रोलपंपासमोर भीषण अपघात; ट्रकचालक मोहसीन मुजावर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कुडाळ,दि.२९ ऑक्टोंबर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुडाळ येथील पेट्रोलपंपासमोर मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुडाळ येथील भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कुडाळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुजावर (वय ४३, रा. माळी कॉलनी, ई वॉर्ड, करवीर, कोल्हापूर) याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ट्रकचालक मोहसीन मुजावर हा एमएच ०९ बीसी ४७०० क्रमांकाचा ट्रक घेऊन जात होता. कुडाळ येथील जिओ रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर त्याने हा ट्रक उभा करून ठेवला होता. ट्रक उभा करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षित उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, ट्रक निष्काळजीपणे व अविचाराने उभा केल्याचा आरोप पोलिसांनी नोंदविलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, याच मार्गावरून भूषण कुडाळकर हे एमएच ०७ झेड ४४३३ क्रमांकाच्या दुचाकीने प्रवास करत असताना उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची धडक बसली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या धडकेत दुचाकीचेही नुकसान झाले.
या प्रकरणी विलास धोंडी कुडाळकर (वय ४४, व्यवसाय पत्रकार, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कुडाळ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मृत भूषण कुडाळकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ होते. या फिर्यादीवरून २८ ऑक्टोबर रोजी रात्री ७.२५ वाजता कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८५, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार कारेकर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला पोलीस हवालदार गोसावी यांनी केली. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.